जिंतूर महामार्गावर ट्रकला अपघात; तीन तास वाहतूक ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2020 13:48 IST2020-07-23T13:47:03+5:302020-07-23T13:48:02+5:30
यापूर्वी १९ जुलै रोजी याच मार्गावर पुलावरून ट्रक खाली कोसळल्याची घटना घडली होती.

जिंतूर महामार्गावर ट्रकला अपघात; तीन तास वाहतूक ठप्प
जिंतूर : संततधार पावसामुळे जिंतूर ते देवगावफाटा या महामार्गावर औषधी घेऊन जाणारा एक ट्रक गुरुवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास रस्त्याच्या मधोमध घसरला. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक ३ तास ठप्प झाली होती. अपघातात तिघे जखमी झाले आहेत.
जिंतूर ते देवगावफाटा या महामार्गावर रस्त्याच्या कडेने साईड पट्ट्या भरण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने केले नाही. त्यामुळे हा रस्ता निसरडा झाला आहे. २३ जुलै रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास एमएच १८/बीजी ४६२९ हा ट्रक औषधी घेऊन नांदेडकडे जात होता. अकोली येथील वळण पुलाजवळ रस्त्याच्या मधोमध हा ट्रक घसरला. या अपघातात ट्रकमधील चालक आणि क्लिनर तसेच भास्कर सडाळ (४५, रा.अकोली) हे जखमी झाले आहेत. या तिघांनाही जिंतूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.
दरम्यान रस्त्याच्या मधोमध ट्रक पलटी झाल्याने या मार्गावरील वाहतूक ३ तासांपासून ठप्प आहे. दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. क्रेन बोलावून ट्रक रस्त्याच्या बाजूला केला जाणार आहे. यापूर्वी १९ जुलै रोजी याच मार्गावर पुलावरून ट्रक खाली कोसळल्याची घटना घडली होती. चार दिवसातील अपघाताची ही दुसरी घटना ठरली आहे.