चक्काजाम आंदोलनामुळे एक तास वाहतूक ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:16 IST2021-02-07T04:16:31+5:302021-02-07T04:16:31+5:30
परभणी : दिल्लीतील शेतकऱ्यांचे आंदोलन दडपण्याचा केंद्र शासनाच्या धोरणाच्या विरोधात शनिवारी पोखर्णी फाटा येथे एक तास चक्काजाम आंदोलन करण्यात ...

चक्काजाम आंदोलनामुळे एक तास वाहतूक ठप्प
परभणी : दिल्लीतील शेतकऱ्यांचे आंदोलन दडपण्याचा केंद्र शासनाच्या धोरणाच्या विरोधात शनिवारी पोखर्णी फाटा येथे एक तास चक्काजाम आंदोलन करण्यात आले. संतप्त शेतकऱ्यांनी यावेळी घोषणाबाजी करीत शेतकऱ्यांच्या आंदोलनाला समर्थन दिले. एक तासाच्या या आंदोलनामुळे गंगाखेड रोडवर दोन्ही बाजूने वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या.
शेतकरी विरोधी असलेले तीन कायदे रद्द करावेत, या मागणीसाठी ७२ दिवसांपासून दिल्ली येथे शेतकरी आंदोलन करीत आहेत. मात्र हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केंद्र शासन करीत असल्याने येथील शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीने तीव्र संताप व्यक्त करीत केंद्राच्या या धोरणाविरुद्ध शनिवारी चक्काजाम आंदोलनाची हाक दिली. शनिवारी सकाळी ११ वाजेपासूनच पोखर्णी फाटा येथे शेतकऱ्यांची गर्दी झाली. दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास प्रत्यक्ष आंदोलनाला प्रारंभ झाला. रस्त्याच्या मधोमध शेतकरी ठाण मांडून बसल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. शेतकरी विरोधी काळे कायदे रद्द करावेत, अशी मागणी करीत यावेळी शेतकऱ्यांनी केंद्र शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे संपूर्ण परिसर दणाणून गेला. जवळपास एक तास केलेल्या या आंदोलनामुळे राष्ट्रीय महामार्ग असलेल्या या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. आजच्या देशव्यापी आंदोलनानंतरही कृषी कायदे परत घेतले नाही तर आणखी तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.
यावेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना कॉ. विलास बाबर म्हणाले, मागील ७२ दिवसांपासून शेतकरी आंदोलन करीत आहेत. शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेऊन शासनाने हे कायदे परत घेतले पाहिजेत. मात्र तसे न करता उलट आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे. आंदोलनाच्या मार्गावर खिळे ठोकणे, खंदक खांदणे हा प्रकार निंदनीय आहे. केंद्र शासनाच्या या कृतीचा आम्ही निषेध करतो, असे त्यांनी सांगितले. त्यानंतर मंडळ अधिकाऱ्यांमार्फत मागण्यांचे निवेदन राष्ट्रपतींना पाठवण्यात आले. कॉ. विलास बाबर यांच्यासह माणिक आव्हाड, पिंटू वाघ,नागेश शिंदे, रूसतुम संसारे, गोविंद भोसले, जगन्नाथ पवार, कमलाकर बाबर, वसंत पवार, भास्कर गवळी, गोविंद भांड, अशोक साखरे, विष्णू मोगले, पंडितराव गोरे, उद्धव ढगे, विलास दळवे, पांडुरंग पारधे, राम गबाळे, गणेशराव वाघ, नारायण वाघ, नरहरी वाघ, दिगांबर गमे, दामोदर काळे, विष्णू ढगे, लक्ष्मण ढोबरे, कमलेश ठेंगे, रवी बाबर, परमेश्वर कदम, मदन शिंदे, नागनाथ पवार, विठ्ठल वाघ यांच्यासह बहुसंख्य शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते.