रजा मंजूर करण्यासाठी वाहतूक निरीक्षकाने घेतली लाच; एसटी महामंडळ परभणी आगारात एसीबीचा ट्रॅप
By राजन मगरुळकर | Updated: April 16, 2026 22:14 IST2026-04-16T22:10:36+5:302026-04-16T22:14:18+5:30
- राजन मंगरूळकर परभणी : परभणी आगारात कार्यरत तक्रारदार चालकाला मित्राच्या लग्नाला जाण्यासाठी एक दिवसाची रजा पाहिजे होती. ही ...

रजा मंजूर करण्यासाठी वाहतूक निरीक्षकाने घेतली लाच; एसटी महामंडळ परभणी आगारात एसीबीचा ट्रॅप
- राजन मंगरूळकर
परभणी : परभणी आगारात कार्यरत तक्रारदार चालकाला मित्राच्या लग्नाला जाण्यासाठी एक दिवसाची रजा पाहिजे होती. ही रजा मंजूर करण्यास आगारातील वाहतूक निरीक्षक यांनी चक्क ५०० रुपयाची लाचेची मागणी केली. या तक्रारीवरून एसीबीच्या झालेल्या सापळा कारवाईत गुरुवारी वाहतूक निरीक्षकाने त्यांच्या कक्षात ही लाच रक्कम स्वीकारली.
रतन नामदेव शेलार (४७, वाहतूक निरीक्षक गट क, एसटी महामंडळ, परभणी आगार) असे लाच स्वीकारलेल्या आरोपी लोकसेवकाचे नाव आहे. तक्रारदार परभणी आगारात चालक म्हणून कार्यरत असून त्यांनी आरोपी लोकसेवक रतन शेलार यांच्याकडे २१ एप्रिलला मित्राच्या लग्नाला जाण्यासाठी एक दिवसाची रजा मंजूर करण्याचा अर्ज दिला असता ही रजा मंजूर करण्यासाठी वाहतूक निरीक्षक शेलार यांनी ५०० रुपयाची लाच मागणी केल्याची तक्रार तक्रारदाराने एसीबी परभणी विभागाकडे बुधवारी दिली होती. या तक्रारीवरून एसीबीचे पोलीस उपअधीक्षक महेश पाटणकर यांच्यासह पथकाने पडताळणी केली. तक्रारदार व पंच यांना परभणी बसस्थानक कार्यालयात पाठविले असता आरोपी लोकसेवक शेलार यांनी ५०० रुपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून सापळा कारवाई दरम्यान वाहतूक निरीक्षकाच्या कक्षात ही लाच रक्कम तक्रारदार यांच्याकडून आरोपी लोकसेवक याने स्वीकारली. मोबाईल जप्ती, आरोपीच्या घराची झडती घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे. संबंधित आरोपी लोकसेवकाला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती सापळा अधिकारी महेश पाटणकर, तपास अधिकारी मनीषा पवार यांनी दिली.