बाजारपेठ सुरू करण्यासाठी व्यापाऱ्यांची निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:17 IST2021-04-09T04:17:43+5:302021-04-09T04:17:43+5:30
ब्रेक द चेन अभियानांतर्गत जिल्ह्यातील बाजारपेठेतील अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने दोन दिवसांपासून बंद ठेवली जात आहेत. विशेष म्हणजे, ...

बाजारपेठ सुरू करण्यासाठी व्यापाऱ्यांची निदर्शने
ब्रेक द चेन अभियानांतर्गत जिल्ह्यातील बाजारपेठेतील अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने दोन दिवसांपासून बंद ठेवली जात आहेत. विशेष म्हणजे, इतर व्यवहार मात्र सुरळीत सुरू आहेत. त्यामुळे ८ एप्रिल रोजी व्यापाऱ्यांनी शहरातील शिवाजी चौक भागात एकत्र येत जोरदार निदर्शने केली. शासनाच्या धोरणाविरुद्ध घोषणाबाजी करण्यात आली. शहरातील बाजारपेठ सुरू करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. त्यानंतर शिवाजी चौकापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत रॅली काढून निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांना निवेदन देण्यात आले.
बाजारपेठेतील व्यवहार बंद केल्याने बँकेचे व्याज, हप्ता, दुकान भाडे, कामगारांचे पगार शिवाय घरखर्च आदी खर्च निघत नाही. व्यापाऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. बाजारपेठ बंद ठेवण्याचे आदेश म्हणजे व्यापाऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम शासनाने केली आहे, असा आरोप या निवेदनात करण्यात आला. आर्थिक अडचणींमुळे व्यापाऱ्यांची मानसिकता बदलली असून व्यापारपेठ सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. प्रशासनाला दिलेल्या निवेदनावर परभणी जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सूर्यकांत हाके, कार्याध्यक्ष नितीन वट्टमवार, सचिव सचिन अंबिलवादे, उपाध्यक्ष अफजल पाडेला, रमेशराव कदम, नंदू अग्रवाल, अशोक माटरा, अबू सेठ लुलानिया, अरिफ भाई आदी व्यापाऱ्यांची नावे आहेत.