मरणानंतरही यातना! गावात स्मशानभूमी नाही; भर पावसात मृतदेह नेला गंगाखेडला २५ किमी दूर
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2025 12:28 IST2025-07-26T12:27:05+5:302025-07-26T12:28:00+5:30
स्मशानभूमीअभावी ग्रामस्थांची धावपळ, भर पावसात मृतदेह गंगाखेडला नेऊन अंत्यसंस्कार

मरणानंतरही यातना! गावात स्मशानभूमी नाही; भर पावसात मृतदेह नेला गंगाखेडला २५ किमी दूर
- प्रमोद साळवे
गंगाखेड (जि. परभणी) : पुनर्वसित खळी गावात स्मशानभूमी नसल्यामुळे एका मृत व्यक्तीच्या कुटुंबासह ग्रामस्थांना तब्बल २५ किलोमीटर अंतरावरील गंगाखेड शहरात अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन जावा लागला. भर पावसात आणि तडजोड करत महादेव नागनाथ झुरे (४०) यांच्या मृतदेहावर गंगाखेड येथे रात्री साडेआठ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.
महादेव नागनाथ झुरे यांचे शुक्रवारी दुपारी अल्पशा आजाराने परभणीच्या सरकारी रुग्णालयात निधन झाले. सायंकाळी मृतदेह खळी गावात आणण्यात आला, मात्र गावात स्मशानभूमी नसल्याने अंत्यसंस्काराचा प्रश्न उभा राहिला. खळी गावाची स्मशानभूमी सध्या कामासाठी बंद असल्याने गंगाखेडला मृतदेह नेण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता.
खळी गावाचा पुनर्वसन ३० ते ३५ वर्षांपूर्वी गोदाकाठावरून करण्यात आला होता. मात्र आजपर्यंत गावात कोणतीही नागरी सुविधा नाही. ३-४ महिन्यांपूर्वी स्मशानभूमीला मंजुरी मिळाल्यानंतर काम सुरू झाले होते, परंतु काही ग्रामस्थांच्या तक्रारीनंतर ती जागा बदलण्यात आली, अशी माहिती खळीचे सरपंच शिवाजी पवार यांनी दिली.
ब्रह्मनाथवाडीसह पुनर्वसित खळीची लोकसंख्या सुमारे १५०० आहे. गावात स्मशानभूमी नाही ही बाब आता गंभीर बनली असून, मृत्यूच्या क्षणीदेखील गावकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. महादेव झुरे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी आणि आई-वडील असा परिवार आहे.