अवैधरीत्या वाळू उपसा केल्याने तीन ट्रॅक्टर ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:22 IST2021-04-30T04:22:07+5:302021-04-30T04:22:07+5:30

गोदावरी पात्रात रेल्वेपुलाजवळ अवैधरीत्या वाळू उपसा केला जात असल्याची माहिती मिळाल्यावरून २८ एप्रिल रोजीच्या मध्यरात्री बारा वाजता स्थानिक गुन्हे ...

Three tractors seized for illegal sand extraction | अवैधरीत्या वाळू उपसा केल्याने तीन ट्रॅक्टर ताब्यात

अवैधरीत्या वाळू उपसा केल्याने तीन ट्रॅक्टर ताब्यात

गोदावरी पात्रात रेल्वेपुलाजवळ अवैधरीत्या वाळू उपसा केला जात असल्याची माहिती मिळाल्यावरून २८ एप्रिल रोजीच्या मध्यरात्री बारा वाजता स्थानिक गुन्हे शाखेचे हनुमंत जक्केवाड, जमादार बालासाहेब तूपसमींदरे, किशोर चव्हाण, हरीचंद्र खूपसे, दिलावर पठाण, सय्यद मोबीन, सानप, निळे, मारोती माहुरे, योगेश सूर्यवंशी आदींनी रेल्वेपुलाजवळ गोदावरी नदीपात्रात छापा मारला. यावेळी (एमएच २६ इ ३०६३), (एमएच २६ व्ही ८६८१) व अन्य एक असे तीन ट्रॅक्टर वाळू अवैधरीत्या भरून घेऊन जात असल्याचे दिसून आले. पोलीस आल्याचे पाहून ट्रॅक्टर चालकांनी अंधाराचा फायदा घेऊन पळ काढला. पोलिसांनी पाठलाग करून बालाजी बाबुराव जाधव (रा.तुळजा भवानी नगर, गंगाखेड) यास पकडून ताब्यात घेत पंधरा लाख किमतीचे तिन्ही ट्रॅक्टर व २४ हजार किमतीची वाळू असा एकूण १५ लाख २४ हजारांचा मुद्देमाल पोलीस ठाण्यात जमा केला. योगेश सूर्यवंशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बालाजी बाबुराव जाधव (रा.तुळजा भवानी नगर), मुशरीफ खान अथर खान पठाण (रा.गंगाखेड) यांच्यासह अन्य एक चालक व ट्रॅक्टरचे मालक अशा एकूण सहा जणांविरुद्ध वाळूचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास जमादार माहुरे करीत आहेत.

Web Title: Three tractors seized for illegal sand extraction