परभणीत जुगार खेळताना सापडले तीन पोलीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2019 13:42 IST2019-03-15T13:40:08+5:302019-03-15T13:42:06+5:30
छाप्यात सात जणांवर गुन्हे दाखल

परभणीत जुगार खेळताना सापडले तीन पोलीस
परभणी : शहरातील शास्त्रीनगर भागात पोलीसच जुगार खेळत असल्याची गुप्त माहिती सूत्रांकडून मिळाल्यानंतर टाकण्यात आलेल्या छाप्यात तीन पोलीस कर्मचाऱ्यांसह सात जण आढळले असून, त्यांच्यावर नानलपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ही कारवाई बुधवारी रात्री ८ च्या सुमारास करण्यात आली़
शहरातील शास्त्रीनगर भागात जुगार सुरु असल्याची माहिती मिळाल्याने पोलीस निरीक्षक गोवर्धन भूमे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार पुजारी, मुंजाजी हंडे, गोविंद मुरकुटे, अमोल खंदारे, वंदना चव्हाण, सुनंदा साबणे यांच्या पथकाने १३ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास या भागात छापा टाकला असता ७ जण जुगार खेळत असल्याचे दिसून आले.
पोलिसांनी या आरोपींविरुद्ध कारवाई करीत त्यांच्याकडून ९ हजार २४० रुपये रोख आणि सहा मोबाईल असा २८ हजार ४४० रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. या प्रकरणी पोलीस नाईक प्रभाकर रामकिशन बीडकर यांनी तक्रार दिली आहे. त्यावरुन शेखर दुधगावकर, महमद जब्बार, संतोष ऊर्फ कान्हा सोनवणे, विजयसिंह राजपूत या चौघांसह पोलीस कर्मचारी निवृत्ती गिरी, कैलास सूर्यवंशी, रामकिशन खांडेकर यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक पुयड तपास करीत आहेत.