परभणीतील स्त्री रुग्ण विभागाच्या चौकशीसाठी त्रिसदस्यीय समिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2018 00:45 IST2018-04-14T00:45:00+5:302018-04-14T00:45:00+5:30
येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील स्त्री रुग्ण विभाग व स्त्री रुग्णालयातील कामकाजासंदर्भात चौकशी करण्यासाठी औरंगाबाद येथील आरोग्य विभागाच्या उपसंचालकांनी, सहाय्यक संचालकांच्या नेतृत्वाखाली तीन सदस्यांची चौकशी समिती गठित केली आहे.

परभणीतील स्त्री रुग्ण विभागाच्या चौकशीसाठी त्रिसदस्यीय समिती
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील स्त्री रुग्ण विभाग व स्त्री रुग्णालयातील कामकाजासंदर्भात चौकशी करण्यासाठी औरंगाबाद येथील आरोग्य विभागाच्या उपसंचालकांनी, सहाय्यक संचालकांच्या नेतृत्वाखाली तीन सदस्यांची चौकशी समिती गठित केली आहे.
परभणी येथे २००५ मध्ये स्त्री रुग्णालय मंजूर झाले व २००६ मध्ये ते जिल्हा रुग्णालयात कार्यान्वित झाले. स्त्री रुग्णालय सुरु करीत असताना जिल्हा रुग्णालयातील ७० खाटांचा स्त्री रुग्ण विभाग बंद करण्यात आला होता. तब्बल १२ वर्षे हा स्त्री रुग्ण विभाग बंद असल्याची बाब ८ व ९ नोव्हेंबर २०१७ रोजी दिल्ली येथील सीआरएमच्या पथकाने केलेल्या चौकशीत समोर आली होती. या पथकाने शासनाला आपला अहवाल सादर केला होता. त्या अनुषंगाने ‘लोकमत’ने याबाबतचे वृत्त १० मार्च २०१८ रोजी प्रसिद्ध केले होते. त्यानंतर आरोग्य विभागात खळबळ उडाली. जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनाला आपली चूक समजल्यानंतर जिल्हा रुग्णालयातील ट्रामा केअर युनीट येथे २० मार्च रोजी २० खाटांचा स्त्री रुग्ण विभाग सुरु करण्यात आला.
जवळपास १२ वर्षे हा विभाग बंद असल्याने परभणीकरांचा याचा त्रास सहन करावा लागला. या संदर्भात आॅल इंडिया युथ फेडरेशनने आरोग्य उपसंचालकांकडे तक्रार केली होती. त्यामध्ये जिल्हा रुग्णालयातील स्त्री रुग्ण विभाग व स्त्री रुग्णालयाच्या चौकशीची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर औरंगाबाद येथील आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ.विजय कंदवाड यांनी २ एप्रिल रोजी आदेश काढला आहे. त्यामध्ये या प्रकरणात चौकशी करण्यासाठी हिवताप विभागाचे सहाय्यक संचालक डॉ.व्ही.एस.भटकर, आधीक्षक व्ही.एस.माने, सहाय्यक आधीक्षक एम.एम.फारोखी या तीन सदस्यांची चौकशी समिती गठित करण्यात येत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. ही तीन सदस्यीय समिती या प्रकरणाची वस्तुनिष्ठ सखोल चौकशी करुन याबाबतचा स्वयंस्पष्ट अभिप्राय आरोग्य उपसंचालकांना सादर करणार आहे. त्यामुळे १२ वर्षे जिल्हा रुग्णालयातील स्त्री रुग्ण विभाग का बंद केला गेला? याला जबाबदार कोण? याबाबतची माहिती स्पष्ट होणार आहे.