तीन वाहनचालकांना लिपिकपदावर पदोन्नती, सुधारित नियमाने प्रथमच चालकांना मिळाली बढतीची संधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2017 15:47 IST2017-10-27T15:44:14+5:302017-10-27T15:47:06+5:30
वर्ग ४ कर्मचा-यांना वर्ग ३ पदावर पदोन्नती देण्यासाठी स्थानिक पातळीवर अधिकार देण्यात आले आहेत. यापूर्वी सर्वसाधारणपणे शिपाई पदावरील कर्मचा-यांना वर्ग ३ पदावर पदोन्नती दिली जात होती.

तीन वाहनचालकांना लिपिकपदावर पदोन्नती, सुधारित नियमाने प्रथमच चालकांना मिळाली बढतीची संधी
परभणी : जिल्हा प्रशासनातील तीन वाहनचालकांना लिपीक म्हणून पदोन्नती देण्यात आली आहे. सर्वसाधारणपणे शिपाई प्रवर्गातून लिपीक पदी पदोन्नती दिली जाते. मात्र शासनाच्या नव्या आदेशानुसार जिल्हा प्रशासनाने तीन चालकांना पदोन्नतीची संधी दिली आहे.
वर्ग ४ कर्मचा-यांना वर्ग ३ पदावर पदोन्नती देण्यासाठी स्थानिक पातळीवर अधिकार देण्यात आले आहेत. यापूर्वी सर्वसाधारणपणे शिपाई पदावरील कर्मचा-यांना वर्ग ३ पदावर पदोन्नती दिली जात होती. ६ जून २०१७ रोजी राज्य शासनाने अद्यादेश काढून शिपायांप्रमाणेच चालकपदावरील कर्मचा-यांनाही पदोन्नती देण्याचा निर्णय घेतला असून या निर्णयाचा पहिला लाभ परभणी जिल्ह्यातील तीन चालकांना झाला आहे.
कर्मचा-यांना पदोन्नती देण्यासाठी ११ आॅक्टोबर रोजी जिल्हा पदोन्नती निवड समितीची आणि त्यानंतर १७ आॅक्टोबर रोजी विभागीय पदोन्नती समितीची बैठक पार पडली. या बैठकीत तीन चालकांना पदोन्नती देण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयानुसार परभणी येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयातील वाहन चालक सुनील दत्तराव चाफळे, गंगाखेड उपविभागीय अधिकारी कार्यालयातील वाहन चालक सिद्धेश्वर श्रीमंतराव फड आणि पूर्णा तहसील कार्यालयातील प्रदीप रामराव जोगदंड या तीन चालकांना लिपीक म्हणून पदोन्नती देण्यात आली. सुनील चाफळे यांना गंगाखेड तहसील कार्यालय, सिद्धेश्वर फड यांना पालम तहसील कार्यालय आणि प्रदीप जोगदंड यांना पूर्णा येथील तहसील कार्यालयात लिपीक म्हणून नियुक्ती देण्याचे आदेश जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांनी काढले आहेत.
पदोन्नतीसाठी असलेल्या अटी
चालक पदावरुन लिपीक पदावर पदोन्नती देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या निर्णयानुसार चालक पदावर कर्मचा-याने किमान तीन वर्षापेक्षा अधिक नियमित सेवा केलेली असावी, कर्मचारी हा किमान पदवीपर्यंत शिक्षण घेतलेला असावा, या पात्रता निश्चित करण्यात आल्या असून या कर्मचा-यांना कायमस्वरुपी लिपीक पदावर नियुक्ती देण्यात आली आहे. शासनाच्या आदेशामध्ये लिपीक पदी पदोन्नती देताना कर्मचा-याच्या इच्छेलाही महत्त्व दिले असून त्याची इच्छा असेल तरच पदोन्नती द्यावी, असेही म्हटले आहे.
दोन शिपायांनाही पदोन्नतीचा लाभ
जिल्हाधिकारी कार्यालयात शिपाई पदावर काम करणाºया दोन कर्मचा-यांनाही लिपीक म्हणून नियुक्ती आदेश देण्यात आले आहेत. त्यात स्वाती संतराम डोंगरे आणि प्रदीप शालीकराम मुनेश्वर यांना पदोन्नती देण्यात आली असून डोंगरे यांची मानवत तहसील कार्यालयात तर मुनेश्वर यांची सेलू तहसील कार्यालयात लिपीक पदी नियुक्ती केल्याचे आदेश जिल्हाधिकाºयांनी काढले आहेत.