अतिवृष्टीने हजारो हेक्टर शेतजमीन पाण्याखाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:14 IST2021-07-15T04:14:15+5:302021-07-15T04:14:15+5:30
परभणी : मंगळवारी रात्री जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पालम, गंगाखेडसह अन्य तालुक्यांतील हजारो हेक्टर शेतजमीन पाण्याखाली आली आहे. पुराच्या ...

अतिवृष्टीने हजारो हेक्टर शेतजमीन पाण्याखाली
परभणी : मंगळवारी रात्री जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पालम, गंगाखेडसह अन्य तालुक्यांतील हजारो हेक्टर शेतजमीन पाण्याखाली आली आहे. पुराच्या पाण्यामुळे ठिकठिकाणी वाहतूक ठप्प झाली असून, गंगाखेड आणि पालम या दोन तालुक्यांमधील १८ गावांचा संपर्क तुटला आहे.
मागील चार दिवसांपासून दररोज पाऊस होत आहे. मंगळवारी रात्री पावसाला प्रारंभ झाला. अतिवृष्टीसदृश असलेला हा पाऊस जिल्ह्यात सर्वदूर बरसला. या पावसामुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतजमिनी पाण्याखाली गेल्या आहेत. पालम तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली असून, या तालुक्यातील दोन मंडलांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. तालुक्यातील गळाटी आणि लेंडी या नद्यांना पूर आल्याने पालम शहरातील मारुती मंदिरापर्यंत पुराचे पाणी शिरले होते. त्यामुळे तालुक्यातील १० गावांचा संपर्क तुटला आहे. तसेच पुराच्या पाण्यामुळे सुमारे ५ हजार हेक्टर शेतजमीन पाण्याखाली गेली आहे. गंगाखेड तालुक्यातील सुनेगावजवळ इंद्रायणी नदीला पूर आला असून, पुराचे पाणी पुलावरून वाहत असल्याने ८ गावांचा तालुक्याशी संपर्क तुटला आहे. तसेच भांबरवाडी येथेही पुरामुळे वाहतूक ठप्प आहे. सेलू तालुक्यातील मोरेगाव-वालूर या मार्गावर पुलावरून पाणी वाहत असल्याने हा मार्ग बंद झाला आहे. जिंतूर तालुक्यातही मोठ्या प्रमाणात पाऊस झाला असून, येलदरी-ईटोली या रस्त्यावरील ओढ्याला पूर आल्याने चार तास वाहतूक ठप्प होती. सेलू-पाथरी मार्गावरील लेंडी नदीला पूर आल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी होता, तर पालम-ताडकळस या मार्गावरील वाहतूकही ठप्प झाली आहे.
जीप वाहून गेली; चालक बचावला
सेलू तालुक्यातील कुपटा येथील ओढ्याला पूर आल्याने पुराच्या पाण्यात जीप वाहून गेल्याची घटना घडली आहे. जीपचालक मात्र बालंबाल बचावला आहे.
निम्न दुधनाचे १४ दरवाजे उघडले
सेलू तालुक्यातही जोरदार पाऊस झाला असून, पावसाच्या पाण्यामुळे निम्न दुधना प्रकल्पात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली आहे. प्रकल्प पाण्याने १०० टक्के भरला असून, १४ दरवाजे उघडून १४ हजार २८० क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात केला जात आहे.