'मनरेगा'च्या थांबवलेल्या सार्वजनिक कामांचा मार्ग मोकळा; शासनाचे आदेश आले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2025 13:03 IST2025-03-27T13:02:46+5:302025-03-27T13:03:50+5:30

31 डिसेंबर 2023 नंतर शासन स्तरावरून मंजूर कामे सुरू करण्यास मंजुरी

The way for the halted public works of 'MGNREGA' is clear; Government orders have come | 'मनरेगा'च्या थांबवलेल्या सार्वजनिक कामांचा मार्ग मोकळा; शासनाचे आदेश आले

'मनरेगा'च्या थांबवलेल्या सार्वजनिक कामांचा मार्ग मोकळा; शासनाचे आदेश आले

- विठ्ठल भिसे
पाथरी( जि .परभणी ) :
शासन स्तरावरून मंजूर करण्यात आलेल्या आणि सुरू न झालेल्या सिमेंट रोड पेव्हर ब्लॉक आणि पांदण रस्त्याची सार्वजनिक कामे थांबविण्याचे आदेश महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेचे आयुक्त रवींद्र ठाकरे यांनी पाच डिसेंबर 2024 रोजी काढले होते. यावरून राज्यभर मोठा गदारोळ उडाला होता. दरम्यान, राज्य शासनाच्या मनरेगा विभागाने याप्रकरणी 20 मार्च रोजी सुधारित आदेश काढले आहेत. थांबलेल्या कामापैकी 31 डिसेंबर 2023 नंतरची शासन स्तरावरून सर्व मंजूर कामे सुरू करण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे थांबलेल्या सर्व कामांचा मार्ग मोकळा झाला आहे.

महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत  मागच्या महायुती सरकारच्या काळामध्ये  तत्कालीन रोजगार हमी मंत्री यांनी पांदण रस्ते, सिमेंट रोड आणि पेव्हर ब्लॉक या कामांना मोठ्या प्रमाणावर मंजुरी दिली. इतर योजनेत कामे मिळत नसल्याने ग्रामपंचायतकडून या योजनेतील कामांचीमागणीही वाढली गेली. सार्वजनिक कामामध्ये सिमेंट रस्ता (90:10 )आणि पेव्हर ब्लॉक (95 :05 ) या कामात कुशल निधीची रक्कम जास्त असल्याने कामे झपाट्याने पूर्ण होत गेली. कामे पूर्ण होताच एफटीओ तयार करून शासनाकडे कामासाठी कुशल निधी मागणी वाढत गेली. त्यामुळे शासनाकडे निधी मोठ्या प्रमाणावर थकला. त्याच बरोबर निधीचे प्रमाण राखले जात नसल्याने महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेचे आयुक्त रवींद्र ठाकरे यांनी 5 डिसेंबर 2024 रोजी  सार्वजनिक कामांना अचानक ब्रेक लावला. 

नवीन सार्वजनिक कामांना वर्क कोड देण्यात येऊ नये. वर्ककोड देण्यात आली आहेत. मात्र, अद्याप कामे सुरू झाली नाहीत. अशी सार्वजनिक कामे यापुढे सुरू करण्यात येऊ नयेत असे निर्देश दिले होते. त्यानंतर सिमेंट रोड पेव्हर ब्लॉक आणि पांदण रस्त्याची सार्वजनिक कामे थांबली गेली. सार्वजनिक कामांना मंजुरी मिळाल्या नंतर ती कामे थांबवली गेल्याने मोठ्या प्रमाणावर ओरड सुरू झाली. राज्य शासनाकडे लोकप्रतिनिधी कडून कामे सुरू करण्यात यावीत अशी मागणी करण्यात आली होती.

शासनाच्या मनरेगा विभागाने आयुक्त यांच्या 5 डिसेंबर 2024 च्या कामे ठरविण्या यावेत. या आदेशासंदर्भात 20 मार्च रोजी 2025 रोजी नवीन आदेश निर्गमित केले. त्यानुसार 23 डिसेंबर 2023 पूर्वीची शासन स्तरावरून मंजूर सर्व कामे रद्द करण्यात यावीत. तसेच 23 डिसेंबर 2023 नंतर शासन स्तरावरून मंजूर कामे सुरू करण्यात यावीत, असे आदेश काढल्याने या कामाबाबत मार्ग मोकळा झाला आहे.

परभणी जिल्ह्यातील 2391 कामे सुरू होणार
आयुक्त यांच्या पाच डिसेंबर रोजीच्या आदेशानंतर परभणी जिल्ह्यातील 2391 कामे थांबली होती. यात पाथरी तालुक्यातील 563 कामांचा समावेश होता. ही कामे सुरू करण्यास आता हिरवा कंदील मिळाला असून लवकरच निधीची उपलब्धता होणार आहे.

Web Title: The way for the halted public works of 'MGNREGA' is clear; Government orders have come

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :parabhaniपरभणी