परभणी पोलीस अधीक्षकांनी थेट स्वागत कक्षात येऊन वृध्दाची जाणली व्यथा
By राजन मगरुळकर | Updated: April 12, 2025 20:04 IST2025-04-12T20:03:19+5:302025-04-12T20:04:00+5:30
पोलीस अधीक्षकांनी स्वागत कक्षात येऊन एका वृध्दाची व्यथा जाणून घेत आपला साधेपणा दाखवून दिला.

परभणी पोलीस अधीक्षकांनी थेट स्वागत कक्षात येऊन वृध्दाची जाणली व्यथा
परभणी : जिल्ह्यात दर शनिवारी पोलीस अधीक्षक यांच्या संकल्पनेतून तक्रार निवारण दिन पोलीस ठाणे आणि विविध कार्यालयस्तरावर उपक्रम राबविला जातो. यात एकाच दिवशी १२२ तक्रार अर्जांची निर्गती करण्यात आली. विशेष म्हणजे, पोलीस अधीक्षकांनी स्वागत कक्षात येऊन एका वृध्दाची व्यथा जाणून घेत आपला साधेपणा दाखवून दिला.
विशेष म्हणजे, तक्रार निवारण दिनी पोलीस अधीक्षक रवींद्रसिहं परदेशी हे कार्यालयात कामकाज करत होते. कार्यालयाखाली एक ८० वर्षाचे वयोवृद्ध तक्रार अर्ज घेऊन आले होते. हे समजताच स्वतः पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी यांनी केबिनमधून खाली येत स्वागत कक्षात बसून वृद्धाची व्यथा जाणून घेतली. वृध्दास पाणी देत आस्थेने विचारपूस करून त्यांची तक्रार ऐकून घेतली.
ही मोहिम दर शनिवारी पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनात राबविण्यात येते. जिल्ह्यातील सर्व उप विभागीय पोलीस अधिकारी व सर्व पोलीस ठाण्यामध्ये प्रभारी अधिकारी आणि तपासी अंमलदार यांनी सहभाग घेतला.