आजारपणाशी झुंज अपयशी, उपचारादरम्यान सेलूच्या भूमिपुत्र जवानाने घेतला अखेरचा श्वास
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2023 13:01 IST2023-07-21T13:00:43+5:302023-07-21T13:01:12+5:30
उपचारादरम्यान सैनिकाने घेतला अखेरचा श्वास; सेलूत शासकीय इतमामात झाले अंत्यसंस्कार

आजारपणाशी झुंज अपयशी, उपचारादरम्यान सेलूच्या भूमिपुत्र जवानाने घेतला अखेरचा श्वास
- रेवणअप्पा साळेगावकर
सेलू (परभणी ) : सेलू येथील हुसेन नगर येथील रहिवासी असणारे सैन्यदलातील हवालदार शेख गफार शेख संदल( ३९) यांची मुंबई येथे उपचारदरम्यान बुधवारी प्राणज्योत मालवली. सेलू येथील कब्रस्तानात शासकीय इतमामात गुरूवारी रात्री ११:४० वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
शेख गफार शेख संदल भारतीय सैन्यदलात हवालदार या पदावर कार्यरत होते. काही दिवसांपूर्वी प्रकृती अस्वस्थतेमुळे त्यांना मुंबईतील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारदम्यान बुधवारी त्यांची प्राणज्योत मालवली.दरम्यान, जवानाच्या निधनाची वार्ता समजताच सेलू शहरात शोककळा पसरली. गुरूवारी रात्री ११:२० वाजता जवान शेख गफार शेख संदल यांचे पार्थिव सेलूत आणण्यात आले. यावेळी शहरातील शेकडो नागरिकांनी अंत्यदर्शन घेतले. २० माजी सैनिकांनी देखील श्रद्धांजली अर्पण केली.
उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल ओव्हळ तहसीलदार दिनेश झांपले, पोलीस निरीक्षक समाधान चवरे यांनी पुष्पचक्र अर्पणकरून श्रद्धांजली वाहिली. पोलीस मुख्यालयातील जवानांनी सलामी दिली. रात्री ११:४० वाजता येथील कब्रस्तानमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे.