Termination of Rockel Demand from Beneficiaries | लाभार्थ्यांकडून रॉकेलच्या मागणीला पूर्णविराम

लाभार्थ्यांकडून रॉकेलच्या मागणीला पूर्णविराम

ठळक मुद्दे गॅसचे प्रमाण वाढल्याचा परिणाम

परभणी : सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत गोरगरीब लाभधारकांना मिळणाऱ्या रॉकेलच्या मागणीलाच आता पूर्णविराम मिळाला आहे. आॅगस्ट आणि सप्टेंबर या दोन्ही महिन्यात लाभार्थ्यांकडून रॉकेलची मागणी नसल्याने रॉकेल पुरवठा बंद झाला आहे.

गोरगरीब लाभार्थ्यांना स्वयंपाकासाठी इंधन म्हणून राज्य शासनाच्या सार्वजनिक वितरण प्रणालीमार्फत रेशनकार्डावर रॉकेलचा पुरवठा केला जात होता. एकेकाळी शहरी भागासह ग्रामीण भागासाठी मिळून ८६४ किलो लिटर एवढ्या मोठ्या प्रमाणात रॉकेलचे नियतन जिल्ह्याला मंजूर होते. मात्र केंद्र शासनाने धूरमुक्त खेडे करण्याची योजना राबविली. या अंतर्गत उज्ज्वला गॅस योजनेच्या माध्यमातून घरोघरी गॅस जोडणी देण्यात आली. त्यामुळे रॉकेलचा वापर कमी झाला. राज्य शासनाने सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत दिल्या जाणाऱ्या रॉकेलवरही निर्बंध आणले. रेशनकार्डधारकांकडून हमीपत्र भरुन घेण्यात आले. जे कार्डधारक गॅस वापरत नसल्याचे हमीपत्र भरुन देतील त्यांच्यासाठीच रॉकेलची मागणी केली जावू लागली. मागील वर्षी आॅगस्ट महिन्यात परभणी जिल्ह्याला ८६४ किलो लिटर रॉकेलचा पुरवठा करण्यात आला. त्यानंतर मात्र हळूहळू रॉकेलची मागणी कमी होत गेली. आॅगस्ट २०१९ मध्ये २१६ किलो लिटर रॉकेल जिल्ह्याला मिळाले; परंतु, त्यानंतरच्या दोन महिन्यात मात्र तालुकास्तरावरुन रॉकेलची मागणी निरंक असल्याने रॉकेल पुरवठा या दोन्ही महिन्यात बंद झाला आहे.

जुलै महिना : मिळालेले रॉकेल
जिल्हा पुरवठा विभागातून जुलै महिन्यामध्ये २१६ किलो लिटर रॉकेल जिल्ह्याला प्राप्त झाले होते. त्यानुसार परभणी तालुक्याला ३६ किले लिटर, पूर्णा तालुक्याला २४ केएल, सेलू १८ केएल, पाथरी २४ केएल, मानवत १८ केएल.गंगाखेड १२ केएल, सोनपेठ २४ केएल, पालम २४ केएल आणि जिंतूर तालुक्याला ३६ केएल रॉकेलचा पुरवठा करण्यात आला. या महिण्यातील हा रॉकेल पुरवठा या वर्षातील सर्वाधिक ठरला आहे. 


मागणीची होणार तपासणी
दरम्यान, आॅगस्ट महिन्यामध्ये मानवत आणि सेलू या दोन तालुक्यातून प्रत्येकी ६ केएल रॉकेलची मागणी नोंदविण्यात आली आहे. इतर तालुक्यांनी रॉकेलची आवश्यकता नसल्याचे नमूद केले आहे.त्यामुळे या दोन्ही तालुक्यांमध्ये लाभधारकांना कोणत्या कारणासाठी रॉकेल हवी आहे, याची तपासणी पुरवठा निरिक्षकांच्या माध्यमातून केली जाणार आहे. त्यानंतरच रॉकेल पुरवठा होणार असल्याची माहिती मिळाली. 

५९ हजार लाभार्थ्यांना गॅस जोडणी
जुलै महिन्यामध्ये जिल्ह्यातील ५९ हजार लाभार्थ्यांनी हमीपत्र देऊन स्वयंपाकासाठी रॉकेलची मागणी नोंदविली होती. त्यामध्ये परभणी तालुक्यातील ८५००, गंगाखेड ३ हजार ३००, जिंतूर ८ हजार ५००, मानवत ५ हजार ३००, पालम ७ हजार २००.पाथरी ६ हजार ४००, पूर्णा ६ हजार १००, सेलू ६ हजार आणि सोनपेठ तालुक्यातील ६ हजार ३०० लाभार्थ्यांना रॉकेल पुरवठा केला होता. मात्र आॅगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यात यापैकी एकाही लाभार्थ्याने हमीपत्र दिले नसल्याने रॉकेलचा पुरवठा गोठला आहे.


दीनदयाल योजनेतून          गॅस जोडणी
केंद्र शासनाच्या उज्ज्वला गॅस योजनेप्रमाणेच राज्यात दीनदयाल अंत्योदय योजना राबविली जाते. या योजनेंतर्गत गॅस जोडणी नसलेल्या लाभार्थ्याला केवळ १०० रुपयांमध्ये जोडणी दिली जात आहे. लाभार्थ्यानी तहसीलदार किंवा गॅस एजन्सी धारकांकडे आॅनलाईन शिधापत्रिका, बँकेचे पासबुक आदी कागदपत्र देऊन अर्ज करावेत, असे आवाहन प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी ज्योत्स्ना धुळे यांनी केले आहे. 

Web Title: Termination of Rockel Demand from Beneficiaries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.