परभणी : खासगी शिक्षण संस्थेवर प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या एका ३५ वर्षीय शिक्षकाने संस्था सचिवाकडून होत असलेल्या शाळेच्या संचमान्यतेकरिता पैशाच्या मागणीला व मानसिक त्रासाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी सकाळी पाथरी रोड परिसरातील शेतशिवारात घडली आहे. याप्रकरणी संस्था सचिवाविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सोपान उत्तमराव पालवे (वय ३५, रा. आडगाव दराडे, ता. सेलू, ह.मु. विकासनगर, परभणी) असे आत्महत्या केलेल्या शिक्षकाचे नाव आहे. ते मानवत तालुक्यातील मंगरूळ बु. येथील श्री नृसिंह प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून मागील चार वर्षांपासून कार्यरत होते.
शाळेवर शिक्षक म्हणून घेण्याकरिता संस्थेचे सचिव बळवंत मधुकर खळीकर यांनी वीस लाख रुपये घेऊन सुद्धा शिक्षक पालवे यांना नेहमी शाळेच्या संचमान्यतेकरिता आणखी पाच लाख रुपये दे, अशी वारंवार मागणी करत होते. त्याला पालवे कंटाळले होते.
सुसाईड नोटमध्ये सचिवावर गंभीर आरोप
मयत सोपान पालवे यांनी मृत्यूपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये संस्था सचिव बळवंत खळीकर यासह शाळेमध्ये मागील काही महिन्यांत झालेल्या त्रासाबाबत गंभीर आरोप केले आहेत. सदरील आत्महत्या ही आत्महत्या नसून बळवंत खळीकर यांनी केलेला खूनच आहे, माझ्या मृत्यूनंतर सर्वस्वी जबाबदार सचिव बळवंत खळीकर यांना धरावे व मी दिलेले वीस लाख रुपये आणि टप्पा वाढीसाठी घेतलेले पाच लाख रुपये, त्यावरील व्याज माझ्या मृत्यूनंतर माझ्या कुटुंबात पत्नी सागर पालवे व मुलगी स्नेहल पालवे यांना द्यावे, असे त्यांनी लिहून ठेवले.