परभणी : येथील आ.डॉ. राहुल पाटील यांनी सोमवारी शहरातील रेशन दुकानांची पाहणी केली असता, चार दुकाने चक्क बंद आढळल्याने या दुकानदारांवर कारवाई करण्याचे निर्देश आ. पाटील यांनी पुरवठा विभागाला दिले आहेत.
संचारबंदीमुळे उद्योग, व्यवसाय बंद असल्याने राज्य शासनाने रेशन दुकानांवरून गोरगरीब लाभार्थ्यांसाठी मोफत धान्य वितरण सुरू केले आहे. नागरिकांना या धान्याचा सुरळीत पुरवठा होत आहे की नाही, याची पाहणी करण्यासाठी आ.डॉ. राहुल पाटील यांनी १० मे रोजी शहरातील विविध भागांतील स्वस्त धान्य दुकानांना भेटी देऊन धान्य वितरणाची पाहणी केली. यावेळी काही रेशन दुकाने चक्क बंद असल्याची बाब निदर्शनास आली. शहरातील वसमत रोड, कारेगाव रोड तसेच मध्य वस्तीतील दुकानांची आ. पाटील यांनी पाहणी केली. या पाहणीत काही दुकानांमध्ये व्यवस्थित धान्य वितरण सुरू असल्याचेही निदर्शनास आले. मात्र, काही दुकाने चक्क बंद होती. मागील काही दिवसांपासून रेशनच्या धान्यासंदर्भात तक्रारी येत असल्याने आ. पाटील यांनी सोमवारी अचानक भेटी देऊन ही पाहणी केली. यावेळी आ. पाटील यांच्यासमवेत तहसीलदार संजय बिरादार व इतर अधिकारी उपस्थित होते. दरम्यान, बंद असलेल्या रेशन दुकानदारांवर त्वरित कारवाई करावी, असे निर्देश आ. पाटील यांनी पुरवठा विभागाला दिले आहेत. तसेच कोरोनाच्या संकटकाळात गरिबांच्या नावाने आलेले धान्य योग्यरीत्या नियोजन करून वाटप करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत.
चार दुकानदारांना नोटिसा
सोमवारी दिवसभरात आ. पाटील यांनी केलेल्या पाहणीनंतर तहसीलदारांनी अनिल दमकोंडवार, टी.व्ही. जोगळेकर, गणपत सायबूकरिता डी.बी. कांबळे आणि एस.एस. पद्मगिरवार या चार दुकानदारांना कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे. १० मे रोजी दुकान बंद ठेवल्याने दुकानातील धान्यसाठ्याची तपासणी करता आली नाही. तसेच कामकाजाच्या दिवशी दुकान का बंद ठेवले, याचा खुलासा तत्काळ सादर करावा. हा खुलासा वेळेत प्राप्त न झाल्यास दुकानाचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयास सादर करण्यात येईल, असा इशारा या नोटिसीत दिला आहे.