सव्वाशे हेक्टरवर उन्हाळी सोयाबीनची पेरणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:05 IST2021-02-05T06:05:34+5:302021-02-05T06:05:34+5:30
जिंतूर : यावर्षी शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या आवाहनानुसार आतापर्यंत सव्वाशे हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर बीजोत्पादनासाठी उन्हाळी सोयाबीन पिकाची पेरणी केली आहे. ...

सव्वाशे हेक्टरवर उन्हाळी सोयाबीनची पेरणी
जिंतूर : यावर्षी शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या आवाहनानुसार आतापर्यंत सव्वाशे हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर बीजोत्पादनासाठी उन्हाळी सोयाबीन पिकाची पेरणी केली आहे. त्याच बरोबर उपलब्ध पाण्याचा उपयोग घेण्यासाठी ४ हजार हेक्टरवर भुईमुगाचाही पेरा केला असल्याचे तालुका कृषी विभागाच्या अहवालातन नमूद करण्यात आले आहे.
गतवर्षी सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात झालेल्या पावसामुळे तालुक्यातील ३३ हजार ९६७ हेक्टरवर ४० हजार ११२ शेतकऱ्यांनी पेरणी केलल्या सोयाबीन, कापूस, उडीद या पिकांसह अन्य पिकांचे मोठे नुकसान झाले. त्याच बरोबर सोयाबीन कंपन्यांनी बोगस बियाणे शेतकऱ्यांच्या माथी मारले. त्यामुळे शेतकरी नैसर्गिक संकटे व बियाणे कंपन्यांच्या फसवणुकीमुळे आर्थिक कोंडीत सापडला. आगामी खरीप हंगामात तरी शेतकऱ्यांना सोयाबीन बियाणांची कमतरता भासू नये, त्याच बरोबर बियाणे कंपन्यांकडून बोगस बियाणे शेतकऱ्यांच्या पदरी पडू नये, यासाठी जिल्हा व तालुका कृषी विभाग जानेवारी महिन्यापासूनच कामाला लागला आहे. तालुका कृषी विभागाने शेतकऱ्यांना उपलब्ध पाण्याचा उपयोग करून उन्हाळी सोयाबीनची पेरणी बीजोत्पादनासाठी करावी, असे आवाहन केले होते. या आवाहनला प्रतिसाद देत तालुक्यातील शेतकऱ्यांनी आतापर्यंत हंगाम नसतानाही सव्वाशे हेक्टरवर सोयाबीनची बीजोत्पादनासाठी पेरणी केली आहे, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी एस.पी. काळे यांनी दिली आहे. विशेष म्हणजे तालुक्यातील अंगलगाव, ब्राह्मणगाव, अकोली, नागठाणा, वरूड, निलज व अंबरवाडी या गावांमध्ये सर्वाधिक उन्हाळी सोयाबीनची पेरणी करण्यात आली आहे.
चार हजार हेक्टरवर भुईमूग
जिंतूर तालुक्यात उपलब्ध असलेल्या पाण्याचा फायदा घेत तालुक्यातील शेतकऱ्यांनी आतापर्यंत ४ हजार हेक्टरवर भुईमुगाचा पेरा केला आहे. त्यामुळे या भुईमुगातूनही शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळेल, अशी अपेक्षा आहे. त्याच बरोबर शेतकरी आता राष्ट्रीय फलोत्पादन अभियान, नानाजी देशमुख, कृषी संजीवनी योजनेंतर्गत नियंत्रित शेती करण्याकडे वळले असल्याचे दिसून येत आहे.