आरटीपीसीआर प्रयोगशाळेची क्षमता वाढविण्याच्या सूचना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:16 IST2021-04-13T04:16:49+5:302021-04-13T04:16:49+5:30
परभणी : जिल्ह्यातील आरटीपीसीआरच्या तपासण्या वाढविण्याबरोबरच अहवाल देण्यासाठी प्रयोगशाळेची क्षमता वाढविण्याच्या सूचना केंद्राच्या पथकाने जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत. जिल्ह्यातील ...

आरटीपीसीआर प्रयोगशाळेची क्षमता वाढविण्याच्या सूचना
परभणी : जिल्ह्यातील आरटीपीसीआरच्या तपासण्या वाढविण्याबरोबरच अहवाल देण्यासाठी प्रयोगशाळेची क्षमता वाढविण्याच्या सूचना केंद्राच्या पथकाने जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत.
जिल्ह्यातील कोरोनाचा आढावा घेण्यासाठी दोन दिवसांपूर्वी केंद्र शासनाचे एक पथक दाखल झाले होते. असिस्टंट प्रोफेसर डॉ. दिनेश बाबू एस. आणि असोसिएट प्रोफेसर डॉ. रंजना साळवे या अधिकाऱ्यांनी शहरी आणि ग्रामीण भागातील कोरोनाच्या स्थितीचा प्रत्यक्ष फिरून आढावा घेतला. जिल्ह्यात आरटीपीसीआर तपासण्यांची संख्या कमी आहे, ती वाढवावी. त्याचप्रमाणे अहवाल देण्यासाठी प्रयोगशाळेची क्षमता वाढवा, त्यासाठी विद्यापीठातील प्रयोगशाळेशी करार करावा, असे निर्देश दिले. जिल्ह्यातील कोरोना उपाययोजनांबाबत समाधान व्यक्त करतानाच काही बाबींतील त्रुटीही या अधिकाऱ्यांनी निदर्शनास आणून दिल्या. केंद्र शासनाच्या एसओपीनुसार कोरोना रुग्णालयात केवळ रुग्णांनाच प्रवेश द्यावा, त्यांच्या नातेवाइकांना दवाखान्यात प्रवेश देऊ नये, नातेवाइकांना रुग्णांशी संपर्क साधण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा विकसित करावी, रुग्णाला दवाखान्यात दाखल करण्यासाठी आणि तो कोरोनामुक्त झाल्यानंतर दवाखान्यातून बाहेर जाण्यासाठी स्वतंत्र प्रवेशद्वार तयार करावे, अशा सूचनाही या अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील रुग्ण शहरी भागात येऊ नयेत, यासाठी ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी सक्षम करावेत, ग्रामीण भागात पॉईंट वर्कर नियुक्त करावे, जेणेकरून रुग्ण संबंधित कर्मचाऱ्यांशी संपर्क साधून उपचार घेतील, अशा सूचना या अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. कोरोनाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासनाने केलेल्या पूर्वतयारीबद्दल पथकाने समाधान व्यक्त केले.
पोस्ट कोविड केंद्र सुरू करा
कोरोनाबाधित रुग्ण बरा झाल्यानंतरही या रुग्णांना अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. तेव्हा अशा रुग्णांसाठी पोस्ट कोविड केंद्र सुरू करण्याच्या सूचना पथकाने दिल्या आहेत. कोरोनामुक्त झाल्यानंतर या रुग्णांना वेळेत उपचार मिळणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने तयारी करण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यावर परभणी शहरातील लवकरच पोस्ट कोविड कक्ष सुरू केला जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिली.