शिकवणीविना 'एमपीएससी'त यश; परभणीची आंचल अग्रवाल कर निरीक्षक परीक्षेत राज्यात तिसरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2025 14:29 IST2025-09-19T14:28:24+5:302025-09-19T14:29:45+5:30

एमपीएससीचा निकाल जाहीर; खेड्यातील मुलीचे २२ व्या वर्षी यशाला गवसणी

Success in MPSC without tuition; Parbhani's Aanchal Agarwal ranks third in the state in the tax inspector exam | शिकवणीविना 'एमपीएससी'त यश; परभणीची आंचल अग्रवाल कर निरीक्षक परीक्षेत राज्यात तिसरी

शिकवणीविना 'एमपीएससी'त यश; परभणीची आंचल अग्रवाल कर निरीक्षक परीक्षेत राज्यात तिसरी

झरी (जि. परभणी) : प्रामाणिक प्रयत्न, आत्मविश्वास, सातत्य आणि कठोर परिश्रम घेण्याची तयारी असेल तर कुठलेही ध्यये गाठणे अशक्य नाही. हे परभणी तालुक्यातील झरी या खेडेगावातील आंचल अग्रवाल हिने दाखवून दिले. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या कर निरीक्षक परीक्षेत महिला प्रवर्गातून राज्यात तृतीय क्रमांक पटकावून शिकवणीविना यश संपादन केले जाऊ शकते हे दाखवून दिले आहे.

अनेक पालक शालेय शिक्षणाबरोबरच खासगी शिकवणीवर भर देताना दिसतात. मग ते प्राथमिक असो की पदवीधर अशा विविध शैक्षणिक पातळ्यांवर पाल्यांच्या शिकवणीसाठी भरमसाट खर्च करतात. मात्र, शिक्षणाची आवड आणि जीवनात एक ध्येय घेऊन परिश्रम घेणाऱ्यांच्याच हाती यश मिळते. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) नोव्हेंबर २०२४ मध्ये महाराष्ट्र अराजपत्रित गट ब परीक्षा घेण्यात आली. एमपीएसीने२०९ पदांसाठी ही परीक्षा घेतली. १६ नोव्हेंबरला परीक्षेचा निकाल जाहीर झाला. यात महिला प्रवर्गातून परभणी जिल्ह्यातील झरी गावातील आंचल अग्रवाल हिने राज्यातून तिसरा क्रमांक पटकावला. विशेष म्हणजे कुठलेही खासगी शिकवणी क्लासेस नसताना अवघ्या २२ व्या वर्षी महाराष्ट्र राज्य लोकसेवा स्पर्धा परीक्षेत पहिल्याच प्रयत्नामध्ये यश संपादन करत इतर विद्यार्थ्यांसमोर आदर्श निर्माण केला आहे.

पहिल्याच प्रयत्नात मिळविले यश
दहावी परीक्षेत ९५ टक्के गुण मिळविल्यानंतरही इतर शाखेत प्रवेश न घेता कला शाखा निवडून स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. अभ्यासातील सातत्य कायम ठेवत कर निरीक्षक पदासाठी अर्ज केला आणि पहिल्याच प्रयत्नात यश संपादन केले. यासाठी तिला काका राजू अग्रवाल, वडील दत्तप्रसाद अग्रवाल यांचे मार्गदर्शन लाभले.

आयएएस होण्याचे स्वप्न
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या स्पर्धेत यश मिळविले असले तरी एवढ्यावरच न थांबता केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षेची तयारी करून जिल्हाधिकारी होण्याचे स्वप्न आहे, असे आंचल अग्रवाल हिने लोकमतशी बोलताना सांगितले.

Web Title: Success in MPSC without tuition; Parbhani's Aanchal Agarwal ranks third in the state in the tax inspector exam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.