वर्दळीच्या चौकात पोलिसांच्या मित्राकडून वाहतूकीचे चोख नियमन; पोलिस अधीक्षकांनी केलं कौतुक
By राजन मगरुळकर | Updated: April 15, 2025 20:12 IST2025-04-15T20:11:34+5:302025-04-15T20:12:28+5:30
पोलीस मित्राचे कार्य पाहून स्वतः पोलीस अधीक्षक जागेवर वाहन लावून थांबले आणि या पोलीस मित्राशी त्यांनी संवाद साधला.

वर्दळीच्या चौकात पोलिसांच्या मित्राकडून वाहतूकीचे चोख नियमन; पोलिस अधीक्षकांनी केलं कौतुक
परभणी : वर्दळीच्या चौकात आणि रस्त्यावर वाहतूक नियमनाचे काम हे वाहतूक पोलीसांचे असते. पण जर एखादा सामान्य माणूस हेच काम स्वत: करत असेल तर ते वेगळेपणाचे ठरते. अनेकांच्या निदर्शनास आलेली ही बाब चक्क पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी यांनाच दिसून आली. मग काय हे पोलीस मित्र कोण, त्यांचे नाव काय, अशा अनेक प्रश्नांचे पडलेले कोडे हे पोलीस अधीक्षक यांनी स्वत:चे सोडवले. संबंधित पोलीस मित्राचे कार्य पाहून पोलीस अधीक्षक जागेवर वाहन लावून थांबले आणि या पोलीस मित्राशी त्यांनी संवाद साधला. हा सर्व प्रकार रविवारी सायंकाळी नानलपेठ काँर्नर भागात घडला.
मुन्ना फरीद अहमद खान (रा.परभणी) वयाने वृद्ध आणि गतिमंद. तरी पण त्यांचे व्यक्तीमत्व सर्वांनाच आपलेसे करणारे आहे. अनेक वर्षापासून शहरातील मुख्य बाजारपेठत गांधी चौक, अपणा कॉर्नर व इतर परिसरात स्वेच्छेने वाहतूक नियमन करण्यासाठी ते प्रयत्न करतात. ज्या ठिकाणी वाहतुकीची समस्या निर्माण झाली, अशा ठिकाणी स्वतःहून पुढाकार घेत समस्या दूर करण्यासाठी पोलिसांना मदत करणारे म्हणून सर्वत्र त्यांची ओळख पोलीस मित्र बनली आहे.
पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी हे नानलपेठ पोलीस ठाण्यास रविवारी सायंकाळी भेट देण्यास जात होते. नानलपेठ पोलीस ठाणे समोरील मुख्य रस्त्याच्या ठिकाणी अडथळा होऊ नये, म्हणून वाहनांना दिशा सांगत दाखवताना मुन्ना फरीद हे पोलीस अधीक्षकांना दिसले. तत्काळ पोलीस अधीक्षक परदेशी यांनी आपले वाहन रस्त्याच्या बाजूला लावून स्वत: मुन्ना फरीद याच्याजवळ जाऊन हस्तांदोलन करून त्यांची आस्थेने विचारपूस केली. नानलपेठचे पोलीस निरीक्षक चितांबर कामठेवाड यांच्याकडून नमूद इसमाची सर्व माहिती जाणून घेतली. या कार्याची त्यांनी प्रशंसा केली.