डॉक्टर, कर्मचाऱ्यांचे घरी कडक निर्बंध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:18 IST2021-04-07T04:18:11+5:302021-04-07T04:18:11+5:30
जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या दुपटीने वाढली आहे. त्यामुळे डॉक्टर, कर्मचाऱ्यांना २४ तास दवाखान्यांमध्ये काम करावे लागत आहे. कोरोनाच्या पहिल्या ...

डॉक्टर, कर्मचाऱ्यांचे घरी कडक निर्बंध
जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या दुपटीने वाढली आहे. त्यामुळे डॉक्टर, कर्मचाऱ्यांना २४ तास दवाखान्यांमध्ये काम करावे लागत आहे. कोरोनाच्या पहिल्या टप्प्यात या कर्मचाऱ्यांसाठी क्वारंटाईन सेंटरची सुविधा केली होती. मात्र, या टप्प्यात या सुविधांना फाटा देण्यात आला. त्यामुळे सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना ड्युटी संपल्यानंतर घरी जावे लागते. घरातील कुटुंबीयांना कोरोनाची लक्षणे जाणवू नयेत. कोरोनापासून दूर राहावे, यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांना घरी कडक निर्बंध पाळावे लागत आहेत. संपूर्ण घर सॅनिटाईज करावे लागत आहे. लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांपासून विलग राहणे यासह इतर बाबी ही मंडळी कटाक्षाने पाळत आहेत. परंतु राज्य शासनाकडून मात्र आरोग्य कर्मचाऱ्यांना आरोग्य सुरक्षिततेसंदर्भात कोणतीही काळजी घेतली जात नाही. स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या या कर्मचार्यांची काळजी शासनानेही घेणे गरजेचे आहे. त्यासाठी उपाययोजना करण्याची आवश्यकता वाढली आहे.
घरच्यांची धाकधूक वाढली
आई-बाबा दोघेही दवाखान्यात काम करतात. कोरोनाच्या रुग्णांना ते बरे करतात. त्यामुळे त्या दोघांची आम्हाला काळजी वाटते, अशी प्रतिक्रिया कर्मचाऱ्यांचा मुलांनी दिली.
घरात पत्नी व दोन लहान मुले असल्याने कोविड सेंटरमधून घरी येताच मी स्नान करतो. कपडे गरम पाण्यात धुवून घेतो. नंतर मिठाच्या पाण्याने गुळण्या करून घेतो. घरात नवीन मास्क लावतो. लहान मुलांमुळे घरातही ६ फुटाचे अंतर पाळतो.
उध्दव राऊत, वार्ड कर्मचारी, सेलू
रुग्ण सेवा देणे हे आमचे प्रथम कर्तव्य आहे. ड्युटीवरून घरी गेल्यानंतर गरम पाण्याने स्नान करतो. सर्व कपडे स्वच्छ सॅनिटायझर करून घेतो. नवीन मास्क घालतो. घरात आई, वडील व आजी असल्याने मी एका स्वतंत्र खोलीत राहतो. कुटुंबाच्या संपर्कात येणे टाळतो.
रवी लाडाने,
कोविड सेंटर, सेलू.
कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे, अशा स्थितीत आरोग्य सेवा देताना कुटुंबाची काळजी वाटते. पण, कर्तव्य तितकेच महत्त्वाचे आहे. ड्युटीवरून घरी गेल्यानंतर कपडे व इतर साहित्य सॅनिटाईज करतो. गरम पाण्याने स्नान करुन नवीन मास्क लावून नंतरच घरात प्रवेश करतो. आई ,वडील व भाऊ यांच्यापासून ६ फूट अंतरावर राहून काळजी घेतो.
डॉ. सुरज अंभोरे, सेलू.