भरधाव ट्रकने परभणीत तीन दुचाकींना उडविले, एकाचा मृत्यू; संतप्त जमावाने ट्रक पेटवला!

By राजन मगरुळकर | Updated: February 16, 2025 22:03 IST2025-02-16T22:01:33+5:302025-02-16T22:03:24+5:30

अपघातात तीन ते चार जण जखमी

Speeding truck hits three two-wheelers in Parbhani, one dies; Angry mob sets truck on fire! | भरधाव ट्रकने परभणीत तीन दुचाकींना उडविले, एकाचा मृत्यू; संतप्त जमावाने ट्रक पेटवला!

भरधाव ट्रकने परभणीत तीन दुचाकींना उडविले, एकाचा मृत्यू; संतप्त जमावाने ट्रक पेटवला!

राजन मंगरुळकर, परभणी: गंगाखेड राष्ट्रीय महामार्गावर एसटी वर्कशॉप ते पिंगळगड नाला दरम्यान एका ट्रक चालकाने भरधाव वेगात वाहन चालवून तीन दुचाकींना पाठीमागून धडक दिली. या घटनेमध्ये दुचाकीवरील एकाचा मृत्यू झाला. तर अन्य तीन ते चार जण जखमी झाले आहेत. ही घटना रविवारी रात्री ८.३० ते ८.४५ च्या सुमारास घडली. यानंतर परिसरातील संतप्त जमावाने हा ट्रक पेटवून दिल्याचा प्रकारही घडला.

गंगाखेड राष्ट्रीय महामार्गावर दुचाकीवर जाणाऱ्या काही जणांना एका ट्रक चालकाने भरधाव वेगात वाहन चालवून धडक दिल्यामुळे हा अपघाताचा प्रकार घडला. यामध्ये शेख रुस्तूम शेख महेबुब (६०, रा. म्हाडा कॉलनी, परभणी) यांचा मृत्यू झाल्याची नोंद जिल्हा रुग्णालयात घेण्यात आली. तर अन्य तीन ते चार जण जखमी असून, रात्री ९.३० पर्यंत त्यांना जिल्हा रुग्णालयात आणण्याची प्रक्रिया सुरू होती. सदरील ट्रक चालक याने भरधाव वेगात वाहन चालविल्याने अपघात घडला तसेच तो ट्रक पादचारी आणि दुचाकी लेनच्या आतमध्ये प्रवेश केल्याने हा प्रकार घडला.

या अपघातानंतर दुचाकीवरील तीन ते चार जण जखमी झाले. संतप्त जमावाने हा ट्रक पेटविल्याचा प्रकार घडला. यानंतर घटनास्थळी अग्नीशमन दलाला पाचारण केले होते. रात्री ९.३० वाजेपर्यंत आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू होते. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी दिनकर डंबाळे, कोतवालीचे पोलीस निरीक्षक संजय ननवरे, वाहतूकचे पोलीस उपनिरीक्षक रविंद्र दीपक, शेख मुश्ताक, वाय.वाय. सिद्दीकी, अनिल राठोड, अनिल गायकवाड यांनी जखमी आणि जमावाला बाजुला करून वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले. यामुळे बराच वेळ वाहतूक कोंडी झाली होती. या घटनेतील जखमींची नावे मात्र समजू शकली नाहीत.

जिल्हा रुग्णालयात नातेवाईकांची गर्दी

घटनेतील मयत शेख रस्तूम शेख महेबुब हे मोटार मेकॅनिक असून त्यांचे उड्डाणपूल परिसरात गॅरेज असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मयताचे कुटूंबिय तसेच नातेवाईक आणि परिसरातील युवकांनी जिल्हा रुग्णालयात गर्दी केली होती. या ठिकाणी नानलपेठ आणि विशेष पोलीस पथक बोलावून परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यात आले.

अग्नीशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न

शहरातील गंगाखेड रोड भागात संतप्त जमावाने ट्रकला पेटविल्यानंतरअग्नीशमन दलाने घटनास्थळी सुमारे एक तास आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. या ठिकाणी अपघातातील जखमी, अपघातग्रस्त वाहने आणि परिसरातील जमलेल्या जमावाकडून व्हिडीओ घेण्याचे काम सुरू होते. अंधार असलेल्या महामार्गावर अग्नीशमन दलाला आग आटोक्यात आणताना मोठे प्रयत्न करावे लागले.

Web Title: Speeding truck hits three two-wheelers in Parbhani, one dies; Angry mob sets truck on fire!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.