निवडणुका ओसरताच ग्रा.पं.ना मिळणार १९ कोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:15 IST2021-01-04T04:15:08+5:302021-01-04T04:15:08+5:30
परभणी : येथील जिल्हा नियोजन समितीने पंचायत विभागाच्या जनसुविधा योजनेंतर्गत ग्रामपंचायतींसाठी प्रस्तावित केलेला १९ कोटी रुपयांचा निधी केवळ आचारसंहितेच्या ...

निवडणुका ओसरताच ग्रा.पं.ना मिळणार १९ कोटी
परभणी : येथील जिल्हा नियोजन समितीने पंचायत विभागाच्या जनसुविधा योजनेंतर्गत ग्रामपंचायतींसाठी प्रस्तावित केलेला १९ कोटी रुपयांचा निधी केवळ आचारसंहितेच्या कारणाने थांबला आहे. निवडणुका पार पडताच हा निधी वितरित करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
मागील काही वर्षांपासून ग्रामपंचायतींच्या निधीत मोठी वाढ झाली आहे. विशेष म्हणजे १४ वा वित्त आयोग, १५ वित्त आयोगाचा निधी यापूर्वी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून वितरित केला जात होता. मात्र, नव्या निर्णयानुसार हा निधी थेट ग्रामपंचायतींच्या खात्यावर जमा होत असल्याने ग्रामपंचायतींनाही आता महत्त्व प्राप्त झाले आहे. या निधीबरोबरच ग्रामपंचायत स्तरावर केल्या जाणाऱ्या कामांसाठी जिल्हा नियोजन समितीने जनसुविधा योजनेंतर्गत १९ कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित केला आहे. एप्रिल २०२० मध्येच या आराखड्यास मंजुरी मिळाली होती. मात्र, मध्यंतरी आलेल्या कोरोनाच्या संकटामुळे हा निधी वितरित करण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या. राज्यातील विकास कामांना गती देण्याच्या उद्देशाने नियोजन विभागाने प्रस्तावित केलेला १०० टक्के निधी जिल्हा स्तरावर उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे आता निधीची कोणतीही अडचण नाही. मात्र, हा निर्णय झाला आणि लगेच ग्रामपंचायत निवडणुका लागल्या. त्यामुळे परत ग्रामपंचायत निवडणुकीच्या आचारसंहितेचा अडसर या निधीसाठी निर्माण झाला आहे. आता आचारसंहिता शिथिल होण्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे. आचारसंहिता शिथिल झाल्यानंतर ग्रामपंचायतींवर अनेक नवीन कारभारी विराजमान होतील. त्यामुळे या कारभाऱ्यांनी कामकाज हाती घेताच, नियोजन विभागाने प्रस्तावित केलेल्या कामांचा निधी त्यांना मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.
छोट्या ग्रामपंचायतींना अधिक निधी
ग्रामीण भागात जास्तीत जास्त विकास कामे राबविता यावेत, या उद्देशाने छोट्या ग्रामपंचायतींसाठी नियोजन समितीने अधिक निधी प्रस्तावित केला आहे. त्यामुळे छोट्या ग्रामपंचायतींना हा निधी प्राप्त करून घेण्याची संधी अधिक आहे. नियोजन समितीने प्रस्तावित केलेल्या १९ कोटी रुपयांपैकी ३ कोटी रुपये मोठ्या ग्रामपंचायतींसाठी, तर १६ कोटी रुपये छोट्या ग्रामपंचायतींसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे हा निधी पदरात पाडून घेण्यासाठी छोट्या ग्रामपंचायतींनाच अधिक संधी राहणार आहे.
या कामांसाठी वापरला जातो निधी
ग्रामपंचायतींच्या अंतर्गत स्मशानभूमीतील कामे करणे, अंगणवाड्यांची दुरुस्ती, ग्रामपंचायत इमारतींची दुरुस्ती यासह गावातील विकास कामांसाठी जनसुविधा योजनेतून निधी खर्च केला जातो. त्यामुळे या निधीतून छोटी-मोठी कामे मार्गी लागतात आणि गावाच्या विकासाला चालना मिळते.