धक्कादायक! शेतात चारा आणण्यासाठी गेलेल्या महिलेचा आढळला मृतदेह
By मारोती जुंबडे | Updated: December 2, 2023 14:25 IST2023-12-02T14:24:34+5:302023-12-02T14:25:08+5:30
विजेच्या शाॅक लागून मृत्यू झाल्याचा कयास

धक्कादायक! शेतात चारा आणण्यासाठी गेलेल्या महिलेचा आढळला मृतदेह
परभणी : शेळीला चारा आणण्यासाठी शेतात गेलेल्या एका महिलेचा मृतदेह आढळल्याची घटना २ डिंसेबरला सकाळी ११ वाजता चारठाणा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील देवगाव फाटा परिसरात घडली. दरम्यान, विजेच्या तारेचा शाॅक लागून मृत्यू झाल्याचा कयास आहे.
सेलू तालुक्यातील देवगावफाटा येथील मीरा हनुमान सातपुते (४५) ही महिला २९ नोव्हेंबर रोजी घरातून एका शेतात शेळीला चारा आणण्यासाठी गेली होती. परंतु, सदर महिला रात्री उशिरा घरी न परतल्याने घरच्यांनी तिचा ठिकठिकाणी शोध घेतला. परंतु ही महिला आढळून आली नाही. त्यानंतर त्याच्या घरच्यांनी ३० नोव्हेंबर रोजी सदर महिला बेपत्ता असल्याची तक्रार चारठाणा पोलीस ठाण्यात नोंदवली होती.
दरम्यान, शनिवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास ही महिला देवगांव - सेलू रस्त्यावरील एका शेतात मृत अवस्थेत आढळून आली. दरम्यान, घटनेची माहिती चारठाणा पोलीसांना मिळाल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी गायकवाड, पोहेका वंसत वाघमारे, रामकिसन कोंडरे, पोलीस नाईक विष्णूदास गरूड , गुप्तचर विभागाचे यु.एस बारहाते आदींनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. मयताच्या पश्चात पती, एक मुलगा,एक मुलगी असा परिवार आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.