धक्कादायक ! कारवाईसाठी गेलेल्या पोलीस पथकावर जेसीबी घालण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 18:25 IST2021-05-17T18:23:45+5:302021-05-17T18:25:09+5:30

कर्मचारी घटनास्थळी जाऊन माती उत्खनन थांबवित असताना ३ ट्रॅक्टर चालकांनी ट्रॅक्टरसह तेथून पोबारा केला.

Shocking! Attempt to put JCB on the body of the police squad that went for action | धक्कादायक ! कारवाईसाठी गेलेल्या पोलीस पथकावर जेसीबी घालण्याचा प्रयत्न

धक्कादायक ! कारवाईसाठी गेलेल्या पोलीस पथकावर जेसीबी घालण्याचा प्रयत्न

ठळक मुद्देपोलीस कर्मचाऱ्यांनी रस्त्याच्या बाजूला होऊन स्वतःचा जीव वाचविला. पथकातील कर्मचाऱ्यांनी जेसीबीचा पाठलाग केला.

परभणी : अवैधरीत्या होत असलेले माती उत्खनन थांबविण्यासाठी गेलेल्या स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकातील कर्मचाऱ्यांच्या दिशेने भरधाव जेसीबी चालवून, जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना पालम तालुक्यातील भोगाव येथे १५ मे रोजी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास घडली.
सहायक पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्यासह स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस कर्मचारी पालम तालुक्यात गस्तीवर असताना,

तालुक्यातील भोगाव येथे गायरान जमिनीतून अवैधरीत्या मातीचे उत्खनन होत असल्याची माहिती त्यांना मिळाली. शनिवारी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास सहायक पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक विश्वास खोले, लटपटे, घोडके, कांबळे आदी कर्मचारी भोगाव परिसरात दाखल झाले. तेव्हा ३ ट्रॅक्टर आणि एका जेसीबीच्या साह्याने माती उत्खनन होत असल्याचे निदर्शनास आले. हे कर्मचारी घटनास्थळी जाऊन माती उत्खनन थांबवित असताना ३ ट्रॅक्टर चालकांनी ट्रॅक्टरसह तेथून पोबारा केला. मात्र, जेसीबीच्या चालकाने पोलिसांच्या दिशेने भरधाव जेसीबी चालविली. पोलीस कर्मचाऱ्यांनी रस्त्याच्या बाजूला होऊन स्वतःचा जीव वाचविला. त्यानंतर, जेसीबी चालकाने तेथून पोबारा केला. त्यानंतर, पथकातील कर्मचाऱ्यांनी जेसीबीचा पाठलाग केला. मात्र, चालकाने जेसीबी जागेवर सोडून तेथून पळ काढला.

या प्रकारानंतर पोलीस उपनिरीक्षक विश्वास खोले यांनी पालम पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. जेसीबी चालकाने भरधाव जेसीबी चालवून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे तक्रारीत म्हटले आहे, तसेच सरकारी कामात अडथळा निर्माण करणे यासह इतर कलमान्वये ३ ट्रॅक्टर चालक, जेसीबी चालक व मालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी जेसीबी जप्त केला आहे. आरोपींचा शोध सुरू आहे.

Web Title: Shocking! Attempt to put JCB on the body of the police squad that went for action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.