पर्समध्ये पैसे ठेवताना धक्का मारला, भर बँकेतून दोन महिलांनी पळवली हजारोंची रक्कम
By ज्ञानेश्वर भाले | Updated: October 10, 2023 17:27 IST2023-10-10T17:26:54+5:302023-10-10T17:27:15+5:30
गुन्हेगारी प्रवृत्तीला पोलिसांकडून कधी लगाम बसणार? असा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

पर्समध्ये पैसे ठेवताना धक्का मारला, भर बँकेतून दोन महिलांनी पळवली हजारोंची रक्कम
- रेवणअप्पा साळेगावकर
सेलू (जि.परभणी) : शहरातील भारतीय स्टेट बँकेतून १६ हजार रुपये उचलून ते पर्समध्ये ठेवत असताना दोन महिलांनी फिर्यादीस धक्का देत तिच्याजवळील पर्समधून रक्कम हिसकावून नेल्याची घटना पुढे आली. याप्रकरणी रात्री उशिरा सेलू ठाण्यात दोन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
उर्मिला भीमा भवाळ (५०, रा. रायपूर) यांनी फिर्याद दिली की, सोमवारी दुपारी शहरातील एसबीआय शाखेतून १६ हजार काढून पर्समध्ये ठेवले. दरम्यान, पांढरा, राखाडी रंगाचे पंजाबी ड्रेस घातलेल्या दोन अनोळखी महिलांनी उर्मिला भवाळ यांना धक्का देत पर्समधील १६ हजार रुपये चोरून नेले. फिर्यादीने आरडाओरडा करेपर्यंत महिलांनी पोबारा केला. विशेष: हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. दुसरीकडं बँकेत सुरक्षारक्षक असताना अशी घटना घडल्याने याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. महिलेच्या फिर्यादीवरून पोलिसांनी पंचनामा केला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, हवालदार तेलंगे तपास करीत आहेत.
अडीच महिन्यांत दुसरी घटना
२७ जुलै सेलू शहरातील एका खासगी बँकेतून दुपारी साडेतीनच्या दरम्यान दीड लाख रोख काढून बाहेर येताना पोलिस कर्मचाऱ्यास दुचाकीवरील दोन चोरट्यांनी लुटून दीड लाखाची बॅग घेऊन चोरट्यांनी पोबारा केला. विशेषतः हा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. या घटनेचा तपास पोलिसांना घेता आला नाही. तोच शहरात पुन्हा सोमवारी भरदिवसा असाच दुसरा प्रकार घडला. त्यामुळे सामाजिक स्वास्थ्य खराब करण्याच्या गुन्हेगारी प्रवृत्तीला पोलिसांकडून कधी लगाम बसणार? असा प्रश्न ऐरणीवर आला आहे.