परभणीत शिवसेना नगरसेवक अमरदीप रोडे यांची हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2019 13:17 IST2019-03-31T13:05:48+5:302019-03-31T13:17:53+5:30
जायकवाडी परिसरामध्ये पाणी भरण्याच्या कारणावरून वाद निर्माण झाला होता.

परभणीत शिवसेना नगरसेवक अमरदीप रोडे यांची हत्या
परभणी : शहरातील जायकवाडी परिसरामध्ये शिवसेनेचे नगरसेवक अमरदीप रोडे यांचा खून झाल्याची घटना आज सकाळी (दि.३१) साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली आहे.
यासंदर्भात मिळालेली प्राथमिक माहिती अशी - जायकवाडी परिसरामध्ये पाणी भरण्याच्या कारणावरून वाद निर्माण झाला होता. हा वाद सोडविण्यासाठी अमरदीप रोडे हे जायकवाडीत दाखल झाले होते. याठिकाणी किरण सोपानराव डाके आणि रवी वसंतराव गायकवाड यांच्यासोबत रोडे यांचा वाद झाला. यातूनच डाके आणि गायकवाड यांनी दगड आणि कुर्हाडीचे घाव घालून रोडे यांना मारहाण केली; त्यातच त्यांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान मारहाणीनंतर आरोपी किरण सोपानराव डाके (३४, राहणार मातोश्री नगर परभणी) आणि रवी वसंतराव गायकवाड (राहणार जायकवाडी परभणी) हे दोघेही पोलीस ठाण्यात हजर झाले. घटनेनंतर परिसरात मोठा जमाव जमला होता. अमरदीप रोडे यांचा मृतदेह सध्या जिल्हा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणला असून या ठिकाणीही मोठा जमाव जमला आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी संजय परदेशी यांच्यासह पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट दिली आहे. ठसे तज्ज्ञ आणि श्वानपथकही घटनास्थळी दाखल झाले आहे.