मानव विकास बसचे सात मार्ग बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:05 IST2021-02-05T06:05:06+5:302021-02-05T06:05:06+5:30
सेलू : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या लाॅकडाऊननंतर इयत्ता पाचवी ते बारावीचे वर्ग सुरू झाले असले, तरी मानव विकास मिशनअंतर्गत ...

मानव विकास बसचे सात मार्ग बंद
सेलू : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या लाॅकडाऊननंतर इयत्ता पाचवी ते बारावीचे वर्ग सुरू झाले असले, तरी मानव विकास मिशनअंतर्गत सुरू असलेल्या बसचे सात मार्ग अद्यापही सुरू झाले नसल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे.
सेलू तालुक्यासाठी मानव विकासाच्या सात बसेस असून, सेलू-खवणे प्रिंपी, हिस्सी-धामणगाव-सेलू, धनेगाव-सेलू, झोडगाव-ढेंगळी, पिंपळगाव-सेलू, कवडधन-सेलू, सातोना-सेलू, जवळा जिवाजी-सेलू, वालूर-सेलू, हट्टा-कुपटा, सिमणगाव-कुपटा, खैरी-देवगावफाटा, मोळा- गिरगाव- देवगावफाटा, सोन्ना- सेलवाडी- बोरगावकर- वालूर, केमापूर- राव्हा- वालूर, शिराळा- सेलू हे १५ मार्ग आहेत. मात्र, यातील हिस्सी- धामणगाव- सेलू, धनेगाव- सेलू, झोडगाव- ढेंगळी पिंपळगाव- सेलू, कवडधन- सेलू, केमापूर- राव्हा- वालूर, शिराळा- सेलू या सात मार्गांवर अद्यापही मानव विकासाची बस सुरू झाली नाही. परिणामी, या मार्गावर विद्यार्थिनींना खासगी वाहतूकने पैसे मोजून शाळा आणि महाविद्यालयात यावे लागत आहे. सेलू, वालूर, देवगावफाटा, कुपटा, गुगळी धामणगाव आणि गोगलगाव पाटीवरील शाळा महाविद्यालयात या बसेसेच्या माध्यमातून विद्यार्थी शिक्षणासाठी ये-जा करतात. सुमारे १,६०० विद्यार्थी अप-डाउन करतात, परंतु अद्यापही सात मार्गावर मानव विकासाची बस सुरू नसल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. कोरोनामुळे अगोदरच शाळा उशिरा सुरू झाल्या आहेत. त्यातच ग्रामीण भागातील सात मार्गांवर विद्यार्थ्यांना बस नसल्याने त्यांना शिक्षणापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. दरम्यान, शिक्षण विभागाकडून पाठपुरावा कमी पडत असल्याची चर्चा पालकामधून होत आहे.
लवकरच सर्व मार्ग सुरू करणार
सेलू तालुक्यासाठी मानव विकासाच्या सात बसेस आहेत. त्यातील बसेस सुरू आहेत. आगारातील चालक, वाहक मुंबई येथे सेवेसाठी गेलेले आहेत. दोन दिवसांत सर्व नियोजन लावून तालुक्यातील मानव विकासाचे सर्व मार्गावर बस सुरू केली जाईल.
- आनंद धर्माधिकारी, आगार, प्रमुख पाथरी