सेलू पोलिसांनी पकडली दुचाकी चोरट्यांची टोळी; ७ दुचाकी हस्तगत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 16:58 IST2021-06-06T16:58:26+5:302021-06-06T16:58:57+5:30
Crime in Parabhani : मागील दोन महिन्यापासून सेलू शहरातील २३ दुचाकी चोरीला गेल्याची नोंद पोलीस ठाण्यात आहे.

सेलू पोलिसांनी पकडली दुचाकी चोरट्यांची टोळी; ७ दुचाकी हस्तगत
सेलू :- दुचाकी चोरणा-या सात आरोपींना सेलू पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून विविध ठिकाणाहून चोरलेल्या सात दुचाकी पोलीसांनी हस्तगत केल्या असल्याची माहिती पोलीस निरीक्षक गोवर्धन भुमे यांनी पञकार परिषदेत दिली.
सेलू शहरात दोन महिन्यापासून दुचाकी चोरीचे सञ सुरू आहे. त्यामुळे पोलीस चोरट्याच्या शोधात आहे. गोपनीय माहिती वरून उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र पाल पोलीस निरीक्षक गोवर्धन भुमे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सरला गाडेकर पोलीस उपनिरीक्षक जसपालसिंग कोडतीर्थवाले, संतोष माळगे पोलीस नाईक रामेश्वर मुंडे, विलास सातपुते, सय्यद रहिम यांच्या पथकाने ४ जून रोजी शेख इम्रान शेख मेहमूद, राजू विजय धापसे, समीर हुसेन पठाण यांना ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यांनी जालना जिल्ह्यातील लिखीत पिंप्री, केदार वाकडी, पाटोदा वाटूर फाटा, मंठा, जालना तसेच सेलू तालुक्यातील मोरेगाव, गव्हा शहरातील शिक्षक काॅलनी मधून दुचाकी चोरल्याची कबुली दिली. या संदर्भात आष्टी, मंठा, जालना ग्रामीण ,बोरी येथील पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.
चोरलेल्या दुचाकी शहरातील रहीम खान आब्बास खा पठाण, मनोज बालचंद्र बशीरे, शेख नासर शेख पाशा, शेख खय्युम शेख खमरोद्दीन यांंना विकल्याची माहिती आरोपींनी पोलीसांना दिल्यानंतर चोरलेल्या दुचाकी विकत घेतलेल्या चौघांना पोलीसांनी ताब्यात घेऊन त्यांच्याकडून सात दुचाकी हस्तगत केल्या आहेत. दरम्यान, यातील मुख्य आरोपी असलेला शेख महेबुब शेख आलादिन रा. रहेमानगर हा पोलीसांना पाहताच फरार झाला आहे. दुचाकी चोरट्याकडून शहरातून चोरीला गेलेल्या दुचाकीचा तपास लावण्याचा प्रयत्न केला जात आहे. दरम्यान, शहरातील २५ ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी नगर पालिकेला पञ दिले असल्याचे भुमे यांनी सांगितले.
सेलूत २३ दुचाकी चोरीला गेल्याची नोंद
मागील दोन महिन्यापासून शहरातील विविध भागातातून दिवसा व राञी दुचाकी चोरीला जात आहेत. २३ दुचाकी चोरीला गेल्याची नोंद पोलीस ठाण्यात आहे.