आता मोफत गणवेश खरेदी योजना शाळा व्यवस्थापन समिती राबविणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2018 15:37 IST2018-06-29T15:36:19+5:302018-06-29T15:37:02+5:30
सर्व शिक्षा अभियान अंतर्गत पहिली ते आठवीपर्यंतच्या अनुजाती-जमाती व दारिद्र्य रेषेखालील कुटूंबातील विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप योजनेच्या प्रक्रियेत बदल करण्यात आला आहे.

आता मोफत गणवेश खरेदी योजना शाळा व्यवस्थापन समिती राबविणार
पाथरी (परभणी ) : सर्व शिक्षा अभियान अंतर्गत पहिली ते आठवीपर्यंतच्या अनुजाती-जमाती व दारिद्र्य रेषेखालील कुटूंबातील विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप योजनेच्या प्रक्रियेत बदल करण्यात आला आहे. थेट लाभ हस्तांतरित योजना बंद करून आता हा निधी शाळा व्यवस्थापन समितीकडे वर्ग करण्यात येऊन त्यांच्या मार्फतच गणवेश खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
महाराष्ट्र शासनाच्या सर्व शिक्षा अभियान अंतर्गत स्थानिक स्वराज्य संस्थाच्या शाळांमधील पहिली ते आठवीमध्ये शिक्षण घेत असलेल्या अनुजाती-जमाती व दारिद्र्य रेषेखालील कुटूंबातील मुली-मुले यांच्यासाठी मोफत गणवेश योजना राबविण्यात येते. प्रति विध्यार्थी दोन गणवेशसाठी ४०० रुपये लाभ देण्यात येत असे. पूर्वी विद्यार्थ्यांच्या पालकांच्या खात्यात ही रक्कम वर्ग करण्यात येत असे. आता या योजनेत बदल करण्यात आला असून शाळा व्यवस्थापन समितीकडे हा निधी वर्ग करून त्या स्तरावर गणवेश खरेदी करण्यात येणार आहे.
तालुक्यात १०६ शाळा
पाथरी तालुक्यात पहिली ते आठवीपर्यंतच्या १०६ शाळा आहेत. यातून गतवर्षी ९६०९ लाभार्थ्यांना थेट हस्तांतर योजनेचा लाभ मिळाला होता. यावर्षी किमान १० हजार विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळू शकतो.
अनुदान उपलब्ध होताच वाटप होणार
शाळा व्यवस्थापन समिती मार्फत मोफत गणवेश वाटप करण्याचा निर्णय झाला असून त्यासाठी अद्याप अनुदान उपलब्ध झालेले नाही. १ जुलैच्या पट नोंदणी नुसार अनुदान वाटप केले जाईल.
- मुकेश राठोड, शिक्षण विस्तार अधिकारी, गट साधन केंद्र पाथरी