१४ महिन्यांपासून स्कूलबस चालकांचा व्यवसाय ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:17 AM2021-05-20T04:17:56+5:302021-05-20T04:17:56+5:30

परभणी : संचारबंदीमुळे मागच्या १४ महिन्यांपासून शाळा बंद असल्याचा सर्वाधिक फटका स्कूलबस चालकांना बसला आहे. व्यवसायात ठप्प झाल्याने या ...

School bus drivers' business stalled for 14 months | १४ महिन्यांपासून स्कूलबस चालकांचा व्यवसाय ठप्प

१४ महिन्यांपासून स्कूलबस चालकांचा व्यवसाय ठप्प

Next

परभणी : संचारबंदीमुळे मागच्या १४ महिन्यांपासून शाळा बंद असल्याचा सर्वाधिक फटका स्कूलबस चालकांना बसला आहे. व्यवसायात ठप्प झाल्याने या चालकांनी सध्या भाजी विक्री आणि मजुरी सारखा पर्याय निवडून कुटुंब जगविण्याची धडपड सुरू केली आहे.

कोरोनाच्या संकटामुळे दीड वर्षांपासून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. एकेक करीत सर्वच व्यवसाय बंद झाल्याने हातावर पोट असणाऱ्या मजुरांची उपासमार होत आहे. त्यातच मागच्या १४ महिन्यांपासून शाळा बंद असल्याने स्कूलबस चालकांची मोठी कोंडी झाली आहे. उत्पन्नाचे साधनच ठप्प झाल्याने कुटुंब जगविण्याबरोबरच वाहन खरेदीसाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड करणे व इतर आर्थिक अडचणी समोर उभ्या ठाकल्या आहेत. त्यावर मात करण्यासाठी काही जणांनी दूध, भाजी विक्री तर काही जणांनी मजुरीची कामे स्वीकारली आहेत. स्कूलबस चालकांना प्रशासनाने आर्थिक मदतीचा हात देण्याची गरज निर्माण झाली आहे.

अरुण चंद्रे

जिंतूर रोड भागात भाजी विक्री

अरुण चंद्रे या स्कूलबस चालकाने कुटुंबाचा उदरनिर्वाह भागत नसल्याने दूध आणि भाजी विक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे. शहरातील जिंतूर रोड भागात एक छोटेखानी डेअरी टाकून चंद्र यांनी हा व्यवसाय सुरू केला आहे. त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नावर कुटुंबाची उपजीविका भागवितात आहेत.

राजू गायकवाड

चालक म्हणून स्वीकारला व्यवसाय

शाळा बंद झाल्याने स्वतःचे वाहन जागेवर उभे आहे. त्यामुळे उत्पन्न ठप्प पडल्याने उपासमारीची वेळ आली. अखेर दुसऱ्या वाहनावर खासगी प्रवासी वाहतूक करण्यासाठी चालक म्हणून सेवा करावी लागत आहे.

शेख जावेद

परभणी शहरातील शेख जावेद या स्कूलबस चालकाने व्यवसाय ठप्प झाल्याने सेंट्रिंगच्या कामावर मजुरी करण्याचा निर्णय घेतला. यातून फारसे उत्पन्न मिळत नसले तरी सध्या कुटुंबाची गुजराण करण्यासाठी शेख जावेद हे झरी येथे सेंट्रिंगची कामे करीत आहेत.

आसेद खान बासेद खान

भाजीपाल्याची विक्री

आसेद खान बासेद खान या स्कूल व्हॅन चालकाने शाळा बंद झाल्यानंतर कुटुंबाची गुजराण करण्यासाठी भाजीपाल्याची विक्री करण्याचा व्यवसाय सुरू केला आहे. येथील दर्गा रोड भागात रस्त्याच्या कडेला बसून ते भाजी विक्री करतात. नवीन व्यवसाय आणि त्यातून फारसे उत्पन्न मिळत नसल्याने आर्थिक समस्या कायम असल्याचे त्यांनी सांगितले.

समी अन्सारी

लोणच्याचा सुरू केला व्यवसाय

समी अन्सारी या स्कूल व्हॅन चालकाने लोणचे विक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे. स्कूल व्हॅन बंद असल्याने दररोजचे उत्पन्न ठप्प पडले. परिणामी उपासमार सुरू झाली. त्यावर मात करण्यासाठी समी अन्सारी यांनी लोणच्याची विक्री सुरू केली आहे. काद्राबाद प्लॉट भागात ते लोणचे विक्री करून कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवत आहेत.

शासनाने मदत करावी

दीड वर्षांपासून स्कूलबस वाहनचालक आर्थिक कोंडीत सापडले आहेत. राज्यशासनाने परमिट ऑटोरिक्षा चालकांना ज्याप्रमाणे आर्थिक मदत केली आहे, त्याप्रमाणे स्कूलबस चालकांनाही मदत करावी, त्यांना उदरनिर्वाहासाठी साधने उपलब्ध करून द्यावे तसेच रेशनचे धान्य द्यावे, स्कूलबस चालकांचे कर्जाचे हप्ते थकले आहेत. सध्या व्यवसाय बंद असल्याने हे हप्ते माफ करावेत, स्कूलबस वाहने सध्या बंद असल्याने ही वाहने शासकीय कामासाठी घेण्याची तरतूद करावी, आदी मागण्या राणा एकता स्कूलबस वाहनचालक संघटनेचे संतोष ठाकूर यांनी केल्या आहेत.

पंधरा हजार

मुले दररोज स्कूल बसने प्रवास करायचे

शहरातील एकूण स्कूलबस १००

शहरातील स्कूलबस चालक ४००

Web Title: School bus drivers' business stalled for 14 months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.