परभणी : उच्च माध्यमिक आणि पदवीचे शिक्षण घेणाऱ्या ६ हजार १०९ विद्यार्थ्यांचे मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्तीचे अर्ज महाविद्यालयांमध्ये प्रलंबित असून, मार्च एंड सात दिवसांवर येऊन ठेपल्याने या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती कधी जमा होणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
मागासवर्गीय घटकातील विद्यार्थ्यांना उच्चशिक्षण घेताना आर्थिक अडचणी जाणवू नयेत, यासाठी केंद्र शासनाच्या वतीने मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती दिली जाते. मार्चअखेर विद्यार्थ्यांच्या खात्यात ही शिष्यवृत्ती जमा होते. मात्र, मार्च महिना संपण्यास केवळ सात दिवसांचा कालावधी शिल्लक असताना जवळपास सहा विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीचे अर्ज महाविद्यालयांमध्येच पडून आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे अर्ज मंजूर केव्हा होणार आणि शिष्यवृत्ती केव्हा मिळणार असा प्रश्न आहे.
दोन हजार विद्यार्थ्यांना लाभ
जिल्ह्यातील २ हजार ३६४ विद्यार्थ्यांचे अर्ज समाज कल्याणकडून मंजूर झाले असून, त्यांच्या खात्यावर ८९ लाख १८ हजार १५२ रुपयांची शिष्यवृत्ती जमा झाली आहे. काही अर्ज बाद झाल्यामुळे या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळू शकली नाही.