जप्त केलेल्या वाहनांची लिलावाद्वारे विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:04 IST2021-02-05T06:04:17+5:302021-02-05T06:04:17+5:30

परभणी : गौण खनिजाची अवैध वाहतूक करताना जप्त केलेल्या परभणी तालुक्यातील वाहनांची आता ई-लिलावाद्वारे विक्री केली जाणार आहे. तहसील ...

Sale of confiscated vehicles by auction | जप्त केलेल्या वाहनांची लिलावाद्वारे विक्री

जप्त केलेल्या वाहनांची लिलावाद्वारे विक्री

परभणी : गौण खनिजाची अवैध वाहतूक करताना जप्त केलेल्या परभणी तालुक्यातील वाहनांची आता ई-लिलावाद्वारे विक्री केली जाणार आहे. तहसील कार्यालय परिसरात अनेक दिवसांपासून उभ्या असलेल्या या वाहनांसंदर्भात ‘लोकमत’ने वारंवार वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर त्याची दखल घेऊन उपविभागीय अधिकारी संजय कुंडेटकर यांनी ई-लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे.

जिल्ह्यातील वाळू घाटांचा लिलाव झाला नसतानाही नदीपात्रातून वाळूचा अवैध उपसा करून त्याची वाहतूक केली जात आहे. वाळूसह इतर गौण खनिजांची अवैधरीत्या वाहतूक करणाऱ्या या वाहनांविरुद्ध तहसील प्रशासनाने कारवाई केली. ही वाहने जप्त करून तहसील कार्यालयाच्या परिसरात लावण्यात आली आहेत. मागील अनेक दिवसांपासून जप्त केलेली वाहने तहसील परिसरात उभी असल्याने या वाहनांचे काय, असा प्रश्न ‘लोकमत’ने उपस्थित केला होता. अखेर या वाहनांसंदर्भात उपविभागीय अधिकारी डॉ. संजय कुंडेटकर यांनी निर्णय घेतला आहे.

गौण खनिजाची वाहतूक करण्यासाठी वर्षभरापासून वाहने जप्त करण्यात आली होती. वाहनमालकांना वारंवार नोटीस पाठवूनही त्यांनी दंड भरला नाही. अपील केले नाही किंवा वाहन सोडवून घेण्याचा प्रयत्नही केला नाही. त्यामुळे आता ई-लिलाव पद्धतीने ही वाहने विक्री करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार १ फेब्रुवारीपासून ई-लिलावाची प्रक्रिया सुरू होणार आहे. १ ते १० फेब्रुवारी या काळात निविदा स्वीकारल्या जाणार असून, १२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत प्राप्त निविदांना मंजुरी दिली जाणार आहे. त्यानंतर १५ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत प्रत्यक्ष ई-लिलाव केला जाणार आहे.

आठ वाहने लिलावात

यासंदर्भात तहसीलदार डॉ. संजय बिरादार यांनी लिलावाची नोटीस काढली आहे. त्यात ट्रॅक्टर हेड, ट्रॉली, आयशर, हायवा, टिप्पर आदी आठ वाहनांचा समावेश आहे. ही वाहने लिलाव पद्धतीने विक्री केली जाणार आहेत.

Web Title: Sale of confiscated vehicles by auction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.