परभणी : शेतकऱ्यांच्या विरोधातील तीन काळे कायदे रद्द करावेत, या मागणीसाठी मागील ७२ दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांचा प्रश्न सोडविवण्याऐवजी दडपशाहीच्या मार्गाने आंदोलकांना जेरीस आणणाऱ्या केंद्र शासनाच्या धोरणाचा निषेध नोंदविण्यासाठी ५ फेब्रुवारी रोजी गंगाखेड रोडवरील पोखर्णी फाटा येथे एक तास जोरदार आंदोलन करण्यात आले. शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीने पुकारलेल्या या आंदोलनात चारशे ते पाचशे शेतकरी सहभागी झाले होते.
दिल्ली येथे आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शविण्यासाठी आणि केंद्र शासनाच्या निषेध नोंदविण्यासाठी हे आंदोलन पुकारले होते. शनिवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास आंदोलनाला प्रारंभ झाला. मुख्य रस्त्यावर आडवे बसून शेतकऱ्यांनी रस्ता अडवून धरल्याने रा्ष्ट्रीय महामार्ग असलेल्या या मार्गावरील वाहतूक एक तास ठप्प झाली होती. शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीचे निमंत्रक विलास बाबर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. पोखर्णी, इंदेवाडी, सुरपिंपरी, पेगरगव्हाण, उमरी, पिंपळगाव, दामपुरी आदी २०ते २५ गावांतील शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले होते. दुपारी १ वाजण्याच्या सुमारास आंदोलन मागे घेण्यात आले. आंदोलनस्थळी पोलिसांनी कडक बंदोबस्त लावला होता.
यावेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना विलास बाबर म्हणाले, मागील ७२ दिवसांपासून शेतकरी दिल्लीच्या सिमेवर कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलन करीत आहेत. हे कायदे रद्द करण्याऐवजी सरकार आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करीत आहे. दिल्ली सिमेवर भिंती उभारणे, रस्त्यावर खंदक खोदणे, खिळे ठोकणेझ, तारांचे कुंपन घालून शेतकऱ्यांचीच नाकाबंदी करण्याचे काम केंद्र शासन करीत आहे. शासनाच्या या शेतकरी विरोधी धोरणाचा तीव्र निषेध करीत असल्याचे बाबर यांनी सांगितले. या आंदोलनात विलास बाबर यांच्यासह गणेशराव वाघ, नारायण वाघ, नागेश वाघ, नरहरी वाघ, रामभाऊ एडके, दिगंबर गमे, विशाल कदम, ज्ञानेश्वर गिरी यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होेते.