संशोधनामुळे समाजाला नवी दिशा मिळते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:17 IST2021-03-31T04:17:45+5:302021-03-31T04:17:45+5:30
परभणी : जागतिक पातळीवर विज्ञानाच्या बळावर आजवर अनेक क्षेत्रात शोध लागले आहेत. संशोधन ही गरजेच्या माध्यमातून निर्माण होणारी एक ...

संशोधनामुळे समाजाला नवी दिशा मिळते
परभणी : जागतिक पातळीवर विज्ञानाच्या बळावर आजवर अनेक क्षेत्रात शोध लागले आहेत. संशोधन ही गरजेच्या माध्यमातून निर्माण होणारी एक चळवळ आहे. संशोधनाच्या माध्यमातून बौद्धिक संपदेमध्ये प्रावीण्य मिळवून आपण आपल्यासह समाजाच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावू शकतो व त्या माध्यमातून समाजाला नवी दिशा मिळते, असे प्रतिपादन वैज्ञानिक प्रा. डॉ. अभिजीत यादव यांनी केले.
परभणी येथील श्री शिवाजी महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता कक्षाच्यावतीने ऑनलाइन पद्धतीने आयोजित ३ दिवसीय प्राध्यापक प्रेरणा कार्यशाळेच्या पहिल्या दिवशी मार्गदर्शन सत्रात बोलत होते. तीन दिवस चालणाऱ्या या कार्यशाळेच्या उद्घाटन सत्राच्या प्रसंगी प्राचार्य डॉ. बाळासाहेब जाधव, उपप्राचार्य डॉ. श्रीनिवास केशेट्टी, उपप्रचार्या डॉ. विजया नांदापूरकर, समन्वयक डॉ. रोहिदास नितोंडे, प्रबंधक विजय मोरे आदी उपस्थित होते.
संशोधन का गरजेचे आहे व संशोधनासाठी विभिन्न संस्थांच्या माध्यमातून निधी कसा मिळवावा, या संदर्भात मार्गदर्शन करताना डॉ. यादव म्हणाले, जगभर व देशातील शेकडो सरकारी आणि खासगी संस्था आहेत की ज्या प्राध्यापक व संशोधकांना समाजोपयोगी व मानव उद्धारासाठी उपयोगी संशोधन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी निधी देतात. अशा संस्थांच्या माध्यमातून प्राध्यापकांनी निधी प्राप्त करून संशोधन करावे. जेणेकरून येणाऱ्या पिढीला दिशादर्शक व उपयोगी सिद्ध होईल.
अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ. बाळासाहेब जाधव म्हणाले, संशोधन काळाची गरज आहे. संशोधनाने वैयक्तिक, महाविद्यालय, विद्यार्थी आणि समाजाचा विकास होतो. तसेच एक नवी दृष्टी मिळते. एकंदरीत समाजाच्या आणि देशाच्या विकासात संशोधन महत्त्वाची भूमिका निभावू शकते.
डॉ. रोहिदास नितोंडे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. उत्कर्ष कित्तेकर यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. सुरेंद्र येनोरकर यांनी आभार मानले. यशस्वीतेसाठी डॉ. रामदास टेकाळे, डॉ. जयंत बोबडे, डॉ. सबिहा सय्यद, डॉ. सचिन येवले, डॉ. गणेश चालींदरवार, डॉ. विजय कळमसे व प्रा.शरद कदम आदींनी प्रयत्न केले. या कार्यशाळेस महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक उपस्थित होते.