सर्वदूर पावसाने परभणी जिल्हावासीय सुखावले; दोन मंडळांमध्ये अतिवृष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2020 03:40 PM2020-07-09T15:40:58+5:302020-07-09T15:43:47+5:30

जिल्ह्याची वार्षिक सरासरी ८३८ मिमी असून, आतापर्यंत २५२.४८ मिमी पाऊस झाला आहे.

Rains everywhere in Parbhani district; Overcast in two circles | सर्वदूर पावसाने परभणी जिल्हावासीय सुखावले; दोन मंडळांमध्ये अतिवृष्टी

सर्वदूर पावसाने परभणी जिल्हावासीय सुखावले; दोन मंडळांमध्ये अतिवृष्टी

Next
ठळक मुद्देबुधवारी रात्री जिल्ह्यात सर्वदूर जोरदार पावसाने हजेरी लावली आहे.सेलू आणि पूर्णा तालुक्यातील दोन मंडळात अतिवृष्टीची नोंद

परभणी : दोन आठवड्यांच्या विश्रांतीनंतर जिल्ह्यात बुधवारी सर्वदूर पाऊस झाला आहे. या पावसामुळे जिल्हावासीय सुखावले आहेत. जिल्ह्यात सरासरी २२.८५ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

यावर्षी जिल्ह्यात समाधानकारक पाऊस होत आहे. खरीप हंगामातील पेरण्या जवळपास पूर्णत्वाकडे गेल्या असून पेरलेल्या बियाणांसाठी हा पाऊस पोषक ठरत आहे. बुधवारी सायंकाळी ४ वाजेपासून जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली. अनेक भागांमध्ये रात्रभर पाऊस बरसला आहे. गुरुवारी सकाळी महसूल प्रशासनाने २२.८५ मिमी पावसाची नोंद घेतली आहे. सोनपेठ तालुक्यामध्ये सर्वाधिक सरासरी ४० मिमी पाऊस झाला आहे. पालम तालुक्यात ३७.३२, गंगाखेड १७.५०, परभणी  १७.७५, जिंतूर १५.५० आणि मानवत तालुक्यामध्ये ६.६७ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

जिल्ह्याची वार्षिक सरासरी ८३८ मिमी असून, आतापर्यंत २५२.४८ मिमी पाऊस झाला आहे. वार्षिक सरासरीच्या तुलनेत ३० टक्के पावसाची नोंद झाली असून, यावर्षी पाऊस सरासरी गाठण्याची शक्यता आहे. पाथरी तालुक्यात सर्वाधिक २९४ मिमी पाऊस झाला आहे. त्याखालोखाल पालम तालुक्यात २८७, मानवत २७४,  सेलू २७४, परभणी २२९, पूर्णा २७०, गंगाखेड २०८, सोनपेठ २२१ आणि जिंतूर तालुक्यामध्ये २१३ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

दोन मंडळांमध्ये अतिवृष्टी
बुधवारी रात्री जिल्ह्यात सर्वदूर जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. त्यात सेलू आणि पूर्णा तालुक्यातील दोन मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. सेलू तालुक्यातील चिकलठाणा मंडळांमध्ये ७० मिमी आणि  पूर्णा तालुक्यातील कातनेश्वर मंडळात ७३ मिमी पाऊस झाला आहे. या दोन्ही मंडळात अतिवृष्टीची नोंद घेण्यात आली आहे.

Web Title: Rains everywhere in Parbhani district; Overcast in two circles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.