परभणी जिल्ह्यात गंगाखेड, पाथरी परिसरात पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2019 23:46 IST2019-10-19T23:46:09+5:302019-10-19T23:46:25+5:30
शनिवारी रात्री गंगाखेड आणि पाथरी परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावली़ इतर तालुक्यांत मात्र दिवसभर ढगाळ वातावरण होते़

परभणी जिल्ह्यात गंगाखेड, पाथरी परिसरात पाऊस
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : शनिवारी रात्री गंगाखेड आणि पाथरी परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावली़ इतर तालुक्यांत मात्र दिवसभर ढगाळ वातावरण होते़
जिल्ह्यात यावर्षी असमाधानकारक पाऊस झाला आहे़ मागील आठवड्यापासून परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे़ मात्र संपूर्ण आठवडाभरात पावसाने पाठ फिरविली़ जिल्ह्यात काही प्रमाणात थंडी वाढत आहे़ त्यातच शनिवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण निर्माण झाले़ परभणी शहर व परिसरात दिवसभर सूर्यदर्शन झाले नाही़ वातावरणात उकाडा वाढला होता़ सायंकाळच्या सुमारास पावसाची भूरभूर झाली़ मात्र मोठा पाऊस झाला नाही़ गंगाखेड शहरामध्ये रात्री ८ वाजेच्या सुमारास जोरदार पावसाला सुरुवात झाली़ साधारणत: १० मिनिटे हा पाऊस झाला़ पाथरी शहर आणि परिसरातही रात्री ९़३० वाजेच्या सुमारास जोरदार पावसाने हजेरी लावली तर जिंतूर तालुक्यातील येलदरी आणि परिसरात रात्री ९़४५ च्या सुमारास पावसाला सुरुवात झाली आहे़ मध्यम स्वरुपाचा हा पाऊस होता़
जिल्ह्यात आतापर्यंत झालेल्या पावसामुळे खरीप पिकांना दिलासा मिळाला़ मात्र प्रकल्पांमध्ये मोठा पाणीसाठा होईल, असा पाऊस झाला नाही़ विशेष म्हणजे जिल्ह्यात येलदरी आणि निम्न दूधना हे दोन मुख्य प्रकल्प आहेत़ या दोन्ही प्रकल्पाच्या कार्यक्षेत्रात असमाधानकारक पाऊस झाला आहे़ बुलडाणा जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे येलदरी प्रकल्प कसाबसा मृतसाठ्यातून बाहेर पडला आहे़ मात्र या प्रकल्पातही समाधानकारक पाणीसाठा नाही़ सेलू तालुक्यातील निम्न दूधना प्रकल्पातही पाणीसाठा नसल्याने दोन्ही तालुक्यांबरोबरच या प्रकल्पांवर अवलंबून असलेल्या गावांत पाण्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे़