सेलूतील रेल्वे मालवाहतूक वर्षभरापासून बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:17 IST2021-04-08T04:17:36+5:302021-04-08T04:17:36+5:30
सेलू : येथील स्थानकावरून धावणाऱ्या मालगाड्यांमधील मालवाहतूक गेल्या वर्षभरापासून बंद करण्यात आल्याने रेल्वेचे जवळपास ५ लाख रुपयांचे उत्पन्न बुडाले ...

सेलूतील रेल्वे मालवाहतूक वर्षभरापासून बंद
सेलू : येथील स्थानकावरून धावणाऱ्या मालगाड्यांमधील मालवाहतूक गेल्या वर्षभरापासून बंद करण्यात आल्याने रेल्वेचे जवळपास ५ लाख रुपयांचे उत्पन्न बुडाले आहे. शिवाय सेलू व परिसरातील शेतकरी व व्यापाऱ्यांना या निर्णयाचा मोठा फटका बसला आहे.
सेलू शहरातून मासे, मिरची, लिंबू, फळे आदींसह शेतमाल रेल्वे मालगाडीने वर्षभरापूर्वी नाशिक, हैदराबाद, मुंबई, दिल्ली, मनमाड, अमृतसर आदी शहरांमध्ये पाठविण्यात येत होता. थेट मालगाडीची सुविधा उपलब्ध असल्याने परिसरातील शेतकऱ्यांना मोठ्या बाजारपेठांमध्ये हा माल विकून अधिक पैसे मिळत होते. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान असताना नांदेड रेल्वे विभागाने गेल्या वर्षभरापूर्वी नियमित रेल्वे गाड्यांना विलंब होत असल्याचे कारण सांगून जानेवारी २०२० मध्ये एक्स्प्रेस गाड्यांतून होणारी मालवाहतूक बंद केली. त्यामुळे सेलू व परिसरातील शेतकऱ्यांना त्यांचा शेतमाल अन्य शहरांमध्ये पाठविता येत नाही. तालुक्यात मोठा निम्न दुधना प्रकल्प आहे. या प्रकल्पातून मासेमारी करून कतला, मरळ, चिलापी आदी माशांची मोठ्या प्रमाणात निर्यात अन्य ठिकाणी करण्यात येते. रेल्वेच्या या निर्णयामुळे ही निर्यातही थांबली आहे. शहरातून मिरची, पपई, लिंबू, नायलाॅन रस्सी आदी माल तपोवन, नंदिग्राम, सचखंड, पुणे आदी एक्स्प्रेस रेल्वे गाड्यांनी पाठविण्यात येत होता. मात्र गेल्या वर्षभरापासून ही प्रक्रिया ठप्प झाली आहे. त्यामुळे नाइलाजाने शेतकऱ्यांना परभणीला जावे लागते. यासाठी गाडीभाडे अधिकचे द्यावे लागते. शिवाय रेल्वेस्थानकावरील हमाली व अन्य बाबींसाठी अधिक रक्कम लागत असल्याने शेतकऱ्यांनी रेल्वेने माल पाठविण्याकडे काणाडोळा केला आहे. यामुळे एकीकडे शेतकऱ्यांचे नुकसान होत असताना दुसरीकडे रेल्वेचेही दरवर्षी यातून जवळपास ५ लाख रुपयांचे मिळणारे उत्पन्न बुडाले आहे. त्यामुळे रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन मालवाहतूक पूर्ववत करावी, अशी मागणी होत आहे.
सेलू परिसरातून मोठ्या प्रमाणात महानगरांमध्ये मालांची निर्यात होत असे. परंतु, वर्षभरापासून येथून मालवाहतूक बंद केल्याने परभणी येथे नेऊन तेथून रेल्वेने माल पाठविणे हे अधिक खर्चीक ठरत आहे. त्यामुळे रेल्वेने या निर्णयाचा फेरविचार करावा.
नंदकुमार बाहेती, उद्योजक, सेलू
हमालांवर बेकारीची कुऱ्हाड
सेलू येथील स्थानकावर शेतमाल रेल्वे डब्यांमध्ये भरणे तसेच उतरवून घेणे आदी कामांसाठी हमाल कार्यरत होते. त्यातून चार पैसे मिळवून ते आपल्या कुटुुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. गेल्या वर्षभरापासून येथील मालवाहतूक बंद पडल्याने त्यांच्यावर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे.