सूर्यवंशी संविधानाचा रक्षणकर्ता, पोलिसांनी त्याची हत्या केली
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2024 05:58 IST2024-12-24T05:58:33+5:302024-12-24T05:58:40+5:30
आरोप सिद्ध झाल्यास कोणालाही सोडणार नाही : मुख्यमंत्री फडणवीस

सूर्यवंशी संविधानाचा रक्षणकर्ता, पोलिसांनी त्याची हत्या केली
परभणी : सोमनाथ सूर्यवंशी हा संविधानाचे रक्षण करीत होता. तो मागासवर्गीय असल्याने पोलिसांनी त्याची हत्या केली. संघाची विचारधारा ही संविधान संपविण्याची विचारधारा आहे. यावर मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत खोटे निवेदन दिल्याने तेही याला जबाबदार आहेत, असा आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांनी केला.
संविधान शिल्पाची तोडफोड झाल्यामुळे पुकारलेल्या परभणी बंददरम्यान ११ डिसेंबर रोजी हिंसाचार झाला होता. यामध्ये सोमनाथ सूर्यवंशी या युवकाचा १५ डिसेंबर रोजी न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर सोमवारी दुपारी २:३५ च्या सुमारास परभणीत नवा मोंढा भागात जाऊन सूर्यवंशी यांच्या कुटुंबाची राहुल गांधी यांनी भेट घेऊन प्रकरणाची माहिती घेतली. पंधरा ते वीस मिनिटे त्यांनी कुटुंबीयांशी चर्चा केली. यावेळी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या प्रतिमेस त्यांनी अभिवादनही केले.
राहुल गांधी यांनी आंबेडकरी चळवळीतील नेते विजय वाकोडे यांच्या कुटुंबीयांचीही भेट घेत वाकोडे यांच्या प्रतिमेस अभिवादन केले. कुटुंबीयांच्या भावना ऐकून सांत्वनही केले. त्यांच्यासमवेत महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथल्ला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, अमित देशमुख, वर्षा गायकवाड, माणिकराव ठाकरे, प्रणिती शिंदे, चंद्रकांत हंडोरे आदी उपस्थित होते.
हा राजकारण नव्हे, न्याय मिळवून देण्याचा विषय
राहुल म्हणाले, हा कोणतेही राजकारण करण्याचा विषय नाही. हा न्याय मिळवून देण्याचा विषय आहे. या घटनेला संघाची विचारधारा जबाबदार आहे. या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत खोटे निवेदन दिले, त्यामुळे याला मुख्यमंत्रीही जबाबदार आहेत, असा आरोपही त्यांनी केला.
पोस्टमार्टेम रिपोर्ट पाहिला, ही शंभर टक्के हत्या आहे : राहुल
राहुल म्हणाले की, ज्या लोकांना मारहाण झाली, त्यांना मी भेटलो. त्यांनी पोस्टमार्टेम रिपोर्ट दाखविला. छायाचित्रे दाखविली. यातून पोलिसांनी त्यांची हत्या केल्याचे दिसत आहे. ही शंभर टक्के हत्या आहे. मागासवर्गीय असल्याने त्यांची हत्या करण्यात आली. याची चौकशी करून संबंधितांना शिक्षा व्हावी.
द्वेष पसरवण्याचा राहुल यांचा उद्देश
राहुल गांधी हे केवळ राजकीय कारणांसाठी महाराष्ट्रात आले. त्यांचा उद्देश लोकांमध्ये द्वेष पसरवण्याचा आहे. आम्ही सर्व प्रकरणांची तपासणी करीत आहोत. हे प्रकरण न्यायालयात आहे. मृत्यू पोलिसांच्या मारहाणीमुळे झाल्याचे सिद्ध झाले, तर कोणालाही सोडले जाणार नाही - देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
माझ्या मुलाला मारून पोलिसांनी हाडे मोडली
पोलिसांच्या मारहाणीत माझ्या मुलाची हाडे मोडली. माझ्या मुलाला अटक केली तर त्याची मला माहितीही दिली नव्हती. पोस्टमॉर्टममध्ये सगळे आले तरीही त्याला गंभीर आजार होता, असे चुकीचे सांगत आहेत, अशी व्यथा मृत सोमनाथ यांची आई विजया सूर्यवंशी यांनी राहुल गांधी यांच्यासमोर मांडली.