परभणी : शहरातील खानापूर फाटा या गजबजलेल्या परिसरात शनिवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास किरकोळ कारणावरून वाद झाल्याने काही जणांमध्ये भांडण झाले. त्यात भर रस्त्यावर लाठीकाठीने मारहाण करण्यात आली. त्यातच एका जणाने त्याच्या ताब्यातील वाहन अन्य एकाच्या अंगावरून दोनदा घातले. सुदैवाने, संबंधिताला जखम झाली नाही त्याचा जीव वाचला. याप्रकरणी नवा मोंढा पोलीस ठाण्यात पोलीस यंत्रणेनेच अखेर फिर्याद देऊन एकूण सहा जणाविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे.
परभणी शहरातील वसमत राष्ट्रीय महामार्गावर खानापूर फाटा हा भाग आहे. अत्यंत वर्दळीच्या या भागात शनिवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास सार्वजनिक ठिकाणी सहा जणांनी मारामारी करून सार्वजनिक शांततेचा भंग केल्याचा प्रकार घडला. विशेष म्हणजे एका वाहनधारकाने अन्य एकाच्या अंगावर वाहन घातले. याबाबतचा व्हिडिओ समाज माध्यमावर रविवारी सकाळी व्हायरल झाला.
ज्याच्या अंगावरून वाहन गेले त्याला सुदैवाने काही झाले नाही. या घटनेनंतर नवा मोंढा पोलीस ठाण्यात एकूण सहा जनाविरुद्ध कलम १९४ (२) बीएनएस प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक महादेव मांजरमकर यांच्यासह पथकाने घटनास्थळी भेट दिली. तपास पोलीस उपनिरीक्षक भोसले करीत आहेत.