सीसीआयकडून ४ लाख क्विंटल कापसाची खरेदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:19 IST2021-02-09T04:19:39+5:302021-02-09T04:19:39+5:30
तालुक्यात ४३ हजार ९७ हेक्टरवर पेरणी झालेली आहे. यामध्ये कापसाची २१ हजार ६३५ हेक्टरवर सर्वाधिक पेरणी झाली आहे. २० ...

सीसीआयकडून ४ लाख क्विंटल कापसाची खरेदी
तालुक्यात ४३ हजार ९७ हेक्टरवर पेरणी झालेली आहे. यामध्ये कापसाची २१ हजार ६३५ हेक्टरवर सर्वाधिक पेरणी झाली आहे. २० नोव्हेंबर रोजी सीसीआयने हमीदराने कापसाची खरेदी सुरू केली होती. परजिल्ह्यासह जिल्हाभरातील शेतकरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डात आपला कापूस विक्रीसाठी घेऊन येत असल्याचे चित्र दिसून येत होते. दररोज ८०० ते ९०० वाहने बाजार समितीच्या यार्डात येऊ लागली. नोव्हेंबर-डिसेंबर तसेच जानेवारी या तीन महिन्यांत शेतकरी मानवत केंद्रावर कापूस विक्री करण्यासाठी पसंती देत होते. दररोज १० हजार क्विंटल आवकची नोंद कृषी उत्पन्न बाजार समितीकडे होत होती. डिसेंबरच्या सुरुवातीला लॉकडाऊन जाहीर होणार असल्याची अफवा पसरल्याने शेतकऱ्यांनी आपला कापूस बाहेर काढत सीसीआयला विक्री करण्यास पसंती दिली. ३० जानेवारीपर्यंत सीसीआयने ३ लाख ९४ हजार कापसाची हमीदराने खरेदी केली. मात्र जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात कापसामध्ये टप्प्याटप्प्याने भाववाढ होत असल्याचे चित्र दिसून आले. खुल्या बाजारात हमीदराएवढाच भाव मिळत असल्याने व कापूस विक्री केल्यानंतर खासगी व्यापाऱ्याकडून रोख रक्कम मिळत असल्याने शेतकरी खासगी व्यापाऱ्यांना आपला कापूस विक्री करून मोकळे होत आहेत. सद्य:स्थितीत कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत ६ जिनिंग व्यावसायिकांनी कापसाची खरेदी सुरू केली आहे. भाववाढीचा परिणाम सीसीआयच्या खरेदीवर झाला आहे. यामुळे सीसीआयचे केंद्रप्रमुख शंकरलाल गलगठ यांनी ८ फेब्रुवारी रोजी बाजार समितीला लेखी पत्र देऊन १३ फेब्रुवारीपासून सीसीआयची खरेदी कायमस्वरूपी बंद होणार असल्याची माहिती दिली.
कापसाची आवक घटली
या वर्षी कापूस हंगाम सुरू झाल्यानंतर सुरुवातीला नोव्हेंबर-डिसेंबर आणि जानेवारी या तीन महिन्यांत कापसाची मोठ्या प्रमाणावर आवक बाजार समितीच्या यार्डात येत होती. मात्र जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून यार्डातील कापसाची आवक घटल्याचे चित्र दिसून येत आहे. दुसरीकडे कापसाचे भाव वाढल्यानेही कापूस राखून ठेवलेल्या शेतकऱ्यांनी विक्रीचा मुहूर्त लांबविला. कापसाची आवक घटल्याचे व्यापारी सांगत आहेत. आणखीन एक महिना कापसाची आवक येणार असल्याचे भाकीत व्यापारी व्यक्त करत आहेत.