सराफा बाजारपेठ बंद ठेवून जाचक कायद्याचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:23 IST2021-08-24T04:23:02+5:302021-08-24T04:23:02+5:30

ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्डने हॉलमार्किंग युनिक आयडीद्वारे शुद्धता तपासणीमध्ये केलेल्या चुकीच्या असंविधानिक बदलाच्या निषेधार्थ देशभरात सराफ व सुवर्णकार व्यावसायिकांनी ...

Protest against oppressive law by keeping bullion market closed | सराफा बाजारपेठ बंद ठेवून जाचक कायद्याचा निषेध

सराफा बाजारपेठ बंद ठेवून जाचक कायद्याचा निषेध

ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्डने हॉलमार्किंग युनिक आयडीद्वारे शुद्धता तपासणीमध्ये केलेल्या चुकीच्या असंविधानिक बदलाच्या निषेधार्थ देशभरात सराफ व सुवर्णकार व्यावसायिकांनी २३ ऑगस्ट रोजी एक दिवसाचा लाक्षणिक बंद पाळला. जिल्ह्यातही या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. परभणी जिल्हा सराफ व सुवर्णकार असोसिएशनच्यावतीने हा बंद पाळण्यात आला. सराफा व्यापाऱ्यांच्या बंदमुळे येथील सराफ बाजारपेठेत दिवसभर शुकशुकाट दिसून आला. याचप्रश्नी सराफ व सुवर्णकार असोसिएशनच्यावतीने जिल्हाधिकारी आंचल गोयल यांना निवेदन देऊन, या कायद्यांचा निषेध नोंदिवला.

ब्युरो ऑफ इंडियन स्टॅण्डर्डने शुद्धतेचा स्टॅम्प दागिन्यांवर मारण्यासाठी हॉलमार्किंग कायदा अंमलात आणला आहे. व्यापाऱ्यांनी या कायद्याचे स्वागत केले. मात्र बीआयएसने शुद्धतेच्या चार प्रमाणित शिक्क्यांमध्ये बदल करीत हॉलमार्किंग युनिक आयडीद्वारे शुद्धता तपासणीची चुकीची व असंविधानिक पद्धत आणली. हे करीत असताना सुवर्णकारांच्या शिखर संस्थेला विश्वासात घेतले नाही. येणाऱ्या अडचणींवर चर्चा न करता बदल करण्यात आले. या पद्धतीमुळे ग्राहकांवर खर्चाचा अतिरिक्त भार पडणार आहे. तसेच व्यापाऱ्यांचेही पेपर वर्क वाढणार आहे. यामुळे या पद्धतीचा निषेध करीत लाक्षणिक बंद पाळण्यात आला. हा कायदा रद्द न केल्यास बेमुदत बंद पुकारण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.

यावेळी असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष सचिन अंबिलवादे, सचिन सुनील दहिवाल यांच्यासह असोसिएशनचे पदाधिकारी, सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Protest against oppressive law by keeping bullion market closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.