नवीन पदनिर्मितीचा प्रस्ताव रखडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:04 IST2021-02-05T06:04:23+5:302021-02-05T06:04:23+5:30
परभणी : जिल्ह्यासाठी स्वतंत्र स्त्री रुग्णालयाची मंजुरी मिळाली असून, या रुग्णालयात नवीन पदांच्या निर्मितीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला असून, तो ...

नवीन पदनिर्मितीचा प्रस्ताव रखडला
परभणी : जिल्ह्यासाठी स्वतंत्र स्त्री रुग्णालयाची मंजुरी मिळाली असून, या रुग्णालयात नवीन पदांच्या निर्मितीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला असून, तो वर्षभरापासून रखडला आहे.
परभणी येथे ४५० खाटांचे जिल्हा रुग्णालय असून, या रुग्णालयात जिल्हाभरातून मोठ्या संख्येने रुग्ण उपचारासाठी येतात. सर्वसाधारण रुग्णांबरोबरच अस्थिरुग्ण, बाल रुग्ण आणि स्त्री रुग्ण विभागातून कामकाज चालविले जात होते. मात्रए रुग्णांची संख्या वाढल्याने उपचार करताना कामाचा ताण निर्माण होत होता. परिणामी जिल्हा रुग्णालयाच्या परिसरामध्ये काही विभागांना स्वतंत्र रुग्णालयांचा दर्जा देण्यात आला आहे. त्यात जिल्हा रुग्णालयातच स्वतंत्र अस्थि रुग्णालय सुरू करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे शनिवार बाजार परिसरामध्ये स्वतंत्र नेत्र रुग्णालयही कार्यरत आहे. या दोन रुग्णालयांप्रमाणेच स्त्री रुग्णालयाचा प्रस्तावही पाठविण्यात आला होता. शनिवार बाजार भागातील नेत्र रुग्णालयाच्या जागेत स्त्री रुग्णालय उभारणीचा प्रस्ताव होता. मात्रए तो कालांतराने बारगळला. त्यानंतर पुन्हा पाठपुरावा करून दर्गा रोड भागात १०० खाटांच्या स्त्री रुग्णालयासाठी जागा मंजूर करण्यात आली. या रुग्णालयाच्या इमारतीचे बांधकामही सुरू झाले आहे. परंतु, वर्षभरापासून रुग्णालय सुरू करण्यासंदर्भात फारशा हालचाली झाल्या नाहीत.
येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात सध्या स्त्री रुग्ण विभागातून कारभार चालविला जातो. या विभागामध्ये उपचारासाठी येणाऱ्या महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने रुग्णांची गैरसोय होते. त्यामुळे स्वतंत्र स्त्री रुग्णालय निर्माण करणे गरजेचे आहे. या रुग्णालयाच्या आकृतीबंधानुसार पद निर्मितीचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयास सादर करण्यात आला आहे. मात्रए या प्रस्तावाला अद्याप मंजुरी मिळाली नाही. या दृष्टीने पाठपुरावा केल्यास पद निर्मितीला मंजुरी मिळून नवीन पदे भरणे सोयीचे होणार आहे. त्यासाठी रखडलेला प्रस्ताव तातडीने मंजूर करण्याच्या दृष्टीने पाठपुरावा करण्याची गरज निर्माण झाली आहे.
नियोजन समितीत उपस्थित केला प्रश्न
चार दिवसांपूर्वी जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री नवाब मलिक यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत जिल्ह्यातील विविध विकासकामांवर चर्चा झाली. त्यात आमदार राहुल पाटील, आमदार मेघना बोर्डीकर, आमदार सुरेश वरपूडकर यांनी जिल्ह्यातील अस्थि रुग्णालय, स्त्री रुग्णालयाचा प्रश्न उपस्थित केला. आमदार मेघना बोर्डीकर म्हणाल्या, जिल्ह्यासाठी स्त्री रुग्णालय मंजूर झाले आहे. मात्र, त्याचे काम अद्याप पूर्ण झाले नाही. आमदार राहुल पाटील यांनी ऑर्थो रुग्णालयासाठी निधी नसल्याने शस्त्रक्रिया होत नाहीत, असा मुद्दा उपस्थित केला तर आमदार सुरेश वरपूडकर यांनी जिल्ह्यात ट्रामा केअर सेंटर मंजूर होऊनही गंभीर रुग्णांना उपचारासाठी नांदेड येथे पाठवावे लागत असल्याचा मुद्दा उपस्थित केला होता.