बाजार समितीची निवडणूक लांबणीवर
By Admin | Updated: January 27, 2015 12:28 IST2015-01-27T12:28:06+5:302015-01-27T12:28:06+5:30
विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या निवडणुकीनंतरच मानवत कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक घ्यावी, असा आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिला आहे.

बाजार समितीची निवडणूक लांबणीवर
मानवत : विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या निवडणुकीनंतरच मानवत कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक घ्यावी, असा आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिला आहे. त्यामुळे मानवत कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक लांबणीवर पडली आहे.
मानवत बाजार समितीची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली होती. बाजार समितीच्या प्रारुप मतदार तसेच अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध होऊन निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या नियुक्तीची अधिसूचनाही काढली होती. परंतु, औरंगाबाद खंडपीठात सावळी येथील माणिक काळे यांनी याचिका दाखल केल्याने ही प्रक्रिया बंद पडली. बाजार समितीच्या निवडणुकीत विविध कार्यकारी सेवा सोयायटी मतदार संघातून ११ जागा, ग्रामपंचायत संघातून ४ जागा, व्यापारी मतदार संघातून २ जागा व हमाल-मापाडी मतदार संघातून १ जागा अशा एकूण १८ जागा आहेत.
बाजार समितीच्या कार्यक्षेत्रामध्ये एकूण ३४ विविध कार्यकारी सेवा सोसायट्या आहेत. यापैकी २0११ ते मार्च २0१३ पर्यंत पंधरा सोसायटीची मुदत संपली आहेत. परंतु, विविधकारणांनी या सोसायटींच्या निवडणुका झाल्या नाहीत. परिणामी रामेटाकळी, हमदापूर, भोसा, मंगरूळ (बु.), हटकरवाडी, किन्होळा, नागरजवळा, आंबेगाव, पिंपळा, आटोळा, राजूरा, नरळद, केकरजवळा, रत्नापूर, गोगलगाव या गावातील सोसायटीच्या सभासदांना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत मतदान करता येणार नव्हते. त्यामुळे मोठय़ा मतदार संघातील प्रतिनिधीत्वकमी होऊन केवळ १९ सोसायटीतीलच सदस्यांना मतदानाचा अधिकार मिळणार होता. त्यामुळे अगोदर सोसायटींची निवडणूक व्हावी व नंतरच बाजार समितीची निवडणूक घ्यावी, अशी याचिका माणिक काळे यांनी औरंगाबाद उच्च न्यायालयामध्ये दाखल केली होती.
औरंगाबाद उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने अगोदर विविध कार्यकारी सेवा सोसायटीची निवडणूक घेऊन नंतरच कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक घ्यावी, असे आदेश दिले. त्यामुळे बाजार समितीची निवडणूक लांबणीवर पडली आहे. त्यामुळे निवडणुकीसाठी बाशिंग बांधून बसलेल्या कार्यकर्त्यांवर निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची वाट पहावी लागणार आहे.
■ विविध कार्यकारी सेवा सोसायटीची निवडणूक घेण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे सोसायटीची निवडणूक घेण्यासाठी हालचाली सुरु झाल्या आहेत.
■ मानवत कृषी उत्पन्न बाजार समितीला २१ जानेवारी २0१५ पर्यंत मिळालेली मुदतवाढ संपली आहे. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीवर लवकरच प्रशासक येण्याची शक्यता आहे.
न्यायालयाच्या या निर्णयामुळे अनेकांना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत मतदान करण्याचा अधिकार मिळणार आहे. त्यामुळे कृऊबा समितीची निवडणूक चुरशीची होणार असल्याचे दिसून येत आहे.