वाळू चोरणारे दोन ट्रक पोलिसांनी पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:16 IST2021-04-18T04:16:46+5:302021-04-18T04:16:46+5:30
पाथरी : तालुक्यातील ढालेगाव रस्त्याने वाळू चोरून नेणारे दोन ट्रक स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने १७ एप्रिल रोजी सकाळी ...

वाळू चोरणारे दोन ट्रक पोलिसांनी पकडले
पाथरी : तालुक्यातील ढालेगाव रस्त्याने वाळू चोरून नेणारे दोन ट्रक स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने १७ एप्रिल रोजी सकाळी पावणेनऊच्या सुमारास पकडले आहेत. या कारवाईत आठ लाख ५४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
माजलगाव तालुक्यातून पाथरी परिसरात वाळूची अवैध वाहतूक केली जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्यावरून या पथकाने पाथरी तालुक्यात दाखल होऊन ढालेगावाकडे जाणाऱ्या वाहनांची तपासणी केली. तेव्हा रामपुरी फाट्यावर एम.एच.०४/ ९५३७ आणि एम.एच. ०४/८०२४ हे दोन ट्रक वाळू घेऊन जात असल्याचे निदर्शनास आले. दोन्ही ट्रकमध्ये प्रत्येकी तीन ब्रास वाळू होती. पोलिसांनी वाळू आणि ट्रक असा ८ लाख ५४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सहायक पोलीस उपनिरीक्षक सूर्यकांत राऊत यांच्या फिर्यादीवरून सय्यद रियाज सय्यद अहमद, सय्यद साबीर सय्यद अहमद (दोघे रा. पिंपळगाव, ता. माजलगाव), असलम खान शौकत खान पठाण आणि शौकत खान सलीम खान पठाण (दोघे रा. इंदिरा नगर, पाथरी) यांच्याविरुद्ध पाथरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत पवार, विश्वास खोले, कर्मचारी सुग्रीव केंद्रे, निलेश भुजबल, शंकर गायकवाड, यशवंत वाघमारे, दीपक मुदीराज, अरुण कांबळे, दीपक मुंडे आदींनी केली.