Petrol price hike in Parbhani; 93.69 per liter | परभणीत पेट्रोलच्या दराचा उच्चांक; ९३.६९ रुपये प्रतिलिटर

परभणीत पेट्रोलच्या दराचा उच्चांक; ९३.६९ रुपये प्रतिलिटर

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर वाढल्यानंतर तेल वितरक कंपन्यांनी पेट्राेल आणि डिझेलच्या दरात वाढ केली आहे. त्यामुळे डिझेलचे दर मुंबईत आतापर्यंतच्या ऐतिहासिक उच्चांकी पातळीवर पाेहाेचले असून, पेट्राेलचे दरही त्याच मार्गावर आहेत. महाराष्ट्रात पेट्राेलचे सर्वाधिक दर परभणीमध्ये असून, तेथे ९३.६९ रुपये प्रतिलिटर या विक्रमी पातळीवर दर पाेहाेचले आहेत.

याशिवाय अनेक शहरांमध्ये पेट्राेल आणि डिझेलचे दर उच्चांकी पातळीवर पाेहाेचले आहेत. इंधनाचे दर उच्चांकी पातळीवर पाेहाेचल्यामुळे सर्वसामान्यांचे कंबरडे माेडले आहे. तेल कंपन्यांनी पेट्राेलच्या दरात २५ पैसे तर डिझेलच्या दरात २६ पैशांनी वाढ केली. त्यामुळे डिझेलचे दर मुंबईत ८१.५८ रुपये प्रतिलिटर झाले आहेत.  

मुंबईत ४ ऑक्टाेबर २०१८ ला पेट्राेलचे दर ९१.३९ रुपयांच्या उच्चांकी पातळीवर हाेते. त्यावेळी कच्च्या तेलाचे दर ८० डाॅलर्स प्रतिबॅरेल एवढे हाेते. आता ते ५५.९५ डाॅलर्स प्रतिबॅरेल इतके आहेत. सध्या कच्च्या तेलाचे दर  ५० टक्क्यांनी वाढले आहेत. काेराेनाविरुद्ध लसीकरण सुरू हाेणार आहे. त्यामुळे जगभरात इंधनाची मागणी वाढली आहे. तसेच आखाती देशांनी विशेषत: साैदीने कच्च्या तेलाच्या उत्पादनात घट करण्याचा निर्णय घेतल्यामुळे कच्च्या तेलाचे दर आणखी वाढू शकतात. देशात सर्वात महाग पेट्राेल आणि डिझेल राजस्थानमधील गंगानगर येथे आहे. येथे पेट्राेल ९६.६३ रुपये, तर डिझेलचे दर ८८.३० रुपये एवढे आहेत.

उत्पादन शुल्कात  झाली मोठी वाढ
केंद्र सरकारकडून सध्या पेट्राेलवर ३२.९८ रुपये, तर डिझेलवर ३१.८३ रुपये उत्पादन शुल्क आकारण्यात येते, तर महाराष्ट्र सरकारकडून पेट्राेल आणि डिझेलवर अनुक्रमे २६ आणि २४ टक्के व्हॅट आकारला जाताे. त्यावर अनुक्रमे १०.२० रुपये आणि ३ रुपये सेसही घेण्यात येताे. 

Web Title: Petrol price hike in Parbhani; 93.69 per liter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.