३३ टक्क्यांनी उडाला पेट्रोलचा भडका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:22 IST2021-06-09T04:22:20+5:302021-06-09T04:22:20+5:30
मार्च २०२० पासून कोरोनाच्या संकटाचा सामना करताना अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. त्यामुळे कुटुंबाचे आर्थिक नियोजन करताना सर्वसामान्यांच्या नाकी नऊ ...

३३ टक्क्यांनी उडाला पेट्रोलचा भडका
मार्च २०२० पासून कोरोनाच्या संकटाचा सामना करताना अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. त्यामुळे कुटुंबाचे आर्थिक नियोजन करताना सर्वसामान्यांच्या नाकी नऊ येत आहेत, तर दुसरीकडे बाजारपेठेतील महागाईने कळस गाठला आहे. त्यातच पेट्रोलचे भावही दिवसेंदिवस गगनाला भिडत आहेत. परभणी जिल्ह्यात राज्यात सर्वाधिक दराने म्हणजे १०३. ८८ पैशांनी पेट्रोलची विक्री होत आहे. मे २०२० मध्ये ७८.३५ रुपये दराने विक्री होणारे पेट्रोल जून २०२१ मध्ये म्हणजे वर्षभरात १०३ रुपये ८८ पैशांवर जाऊन पोहोचले आहे. पेट्रोलचा एवढा दर राज्यातील इतर कोणत्याच जिल्ह्यात दिसून येत नाही. त्यामुळे सर्वसामान्य पेट्रोलच्या दरवाढीने घायाळ झाले असून, वाहनधारकांना दिलासा देण्यासाठी राज्य व केंद्राने समन्वयाने तोडगा काढत पेट्रोलच्या किमती कमी कराव्यात, अशी मागणी होत आहे.
प्रति लिटर २५ रुपयांनी पेट्रोल वाढले
पेट्रोलचे दर दिवसेंदिवस गगनाला भिडत आहेत. वर्षभरातच प्रतिलिटर २५ रुपयांची दरवाढ झाल्याने वाहनधारक त्रस्त झाले आहेत.
प्रति लिटर २७ रुपयांनी डिझेल वाढले
मे २०२० मध्ये ६७.१७ रुपयांनी विक्री होणारे डिझेल जून २०२१ मध्ये ९४.५० रुपये प्रतिलिटर दराने विक्री होत आहे.
३३%
मे २०२० मध्ये ७८.२५ रुपये प्रतिलिटर विक्री होणारे पेट्रोल मे २०२१ मध्ये १०३.८८ पैशांनी विक्री होत आहे. विशेष म्हणजे प्रति लिटरमागे २५.३३ पैशांची वाढ झाली आहे. ज्याची टक्केवारी ३३ टक्के एवढी आहे.
डिझेलच्या दरातही ४० टक्क्यांची वाढ
पेट्रोल दरवाढीबरोबरच डिझेलच्या दरातही भरमसाठ वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
मे २०२० मध्ये ६७.१७ रुपयांनी विक्री होणारे डिझेल मे २०२१ मध्ये ९४.४२ रुपयांवर जाऊन पोहोचले. एक वर्षात डिझेलचे भाव ४०.५७ टक्क्यांवर पोहोचले.
विशेष म्हणजे २७.२५ रुपयांची एका वर्षात लिटरमागे वाढ झाली आहे.