शेतीशी निगडित दुकानांना परवानगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:14 IST2021-05-31T04:14:34+5:302021-05-31T04:14:34+5:30
पत्रकार परिषद : कृषिमंत्री दादा भुसे यांची माहिती परभणी : शेतीशी संबंधित कामांना सुरुवात झाली असून, या कालावधीत शेतकऱ्यांना ...

शेतीशी निगडित दुकानांना परवानगी
पत्रकार परिषद : कृषिमंत्री दादा भुसे यांची माहिती
परभणी : शेतीशी संबंधित कामांना सुरुवात झाली असून, या कालावधीत शेतकऱ्यांना बी-बियाणे, तसेच विविध साहित्याची खरेदी करण्यासाठी सकाळी ७ ते सायंकाळी ७ या वेळेत परवानगी देण्यात आल्याची माहिती कृषिमंत्री दादा भुसे यांनी ३० मे रोजी परभणी येथे पत्रकार परिषदेत दिली.
परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात कृषिमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत रविवारी लातूर, नांदेड, उस्मानाबाद, हिंगोली व परभणी जिल्ह्यांची खरीप हंगाम आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीस पालकमंत्री नवाब मलिक यांच्यासह कृषी विभागाचे सचिव व्हीसीद्वारे उपस्थित होते, तर स्थानिक बैठकीस खा. संजय जाधव, खा. हेमंत पाटील, जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर, आ. राहुल पाटील, आ. मेघना बोर्डीकर उपस्थित होत्या. बैठकीत बी-बियाणे तसेच खताचा आढावा घेण्यात आला. कोरोनामुळे लावलेल्या लॉकडाऊनमध्ये शेतीशी संबंधित खरेदीसाठी दुकानांना सकाळी ७ ते सायंकाळी ७ पर्यंत परवानगी देण्यात आली आहे, तसेच शेतकऱ्यांना खत, बी-बियाणे याबाबत कुठलीही तक्रार असल्यास त्यांनी जिल्हा कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा. पीक कर्ज वाटपासंदर्भात जिल्ह्यात दर आठवड्याला जिल्हाधिकारी आढावा घेतील. त्यानुसार बँकांनी कागदपत्रात शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध करून द्यावे.
मुबलक प्रमाणात बी-बियाणे मिळणार
राज्यस्तरावर जिल्हानिहाय, खत, बियाणे यांचा आढावा मागील महिन्यात घेण्यात आला आहे. त्यानुसार सर्व जिल्ह्यांमध्ये मुबलक प्रमाणात बी-बियाणे, खत उपलब्ध होणार आहे. कोणताही शेतकरी बी-बियाणे व खतापासून वंचित राहणार नाही, तसेच पीक विमा भरणे शेतकऱ्यांना ऐच्छिक केले आहे. याबाबतचा निर्णय नुकताच झाला आहे.
पंचनाम्याचे आदेश
मागील दोन दिवसांपूर्वी परभणी, हिंगोली यासह अन्य काही जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. या पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे करण्याच्या सूचना कृषी विभागाला दिल्या आहेत.