लोकांत असंतोष, भारतात नेपाळसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते: प्रकाश आंबेडकरांचा इशारा
By मारोती जुंबडे | Updated: October 28, 2025 17:58 IST2025-10-28T17:52:32+5:302025-10-28T17:58:17+5:30
देश धोकादायक वळणावर; बेरोजगारी, महागाईमुळे जनता त्रस्त; प्रकाश आंबेडकर यांचा इशारा

लोकांत असंतोष, भारतात नेपाळसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते: प्रकाश आंबेडकरांचा इशारा
परभणी : देशातील सध्याची राजकीय व सामाजिक स्थिती धोकादायक दिशेने जात आहे. लोकांच्या मनातील असंतोष दिवसेंदिवस वाढत असून, जर ही परिस्थिती नियंत्रणात आणली नाही तर भारतात नेपाळ किंवा लद्दाखसारखी स्थिती निर्माण होऊ शकते, असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी दिला.
परभणी शहरातील सावली विश्रामगृह येथे मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांच्या सोबत वंचित बहुजन आघाडीचे जिल्ह्याध्यक्ष प्रमोद कुटे, अशोक सोनवने, सुरेश शेळके यांच्यासह जिल्हा पदाधिकारी उपस्थित होते. आंबेडकर म्हणाले की, केंद्र व राज्य सरकारने सर्वसामान्य जनतेचा विश्वास गमावला आहे. बेरोजगारी, महागाई, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि सामाजिक असमानता यामुळे लोकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. सरकार विरोधात उफाळून येणारा हा असंतोष जर दुर्लक्षित केला, तर देशात जनतेचा रोष नेपाळ किंवा लद्दाखसारखा स्फोटक रूप धारण करू शकतो. तसेच राज्यातील परिस्थितीबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, महाराष्ट्रात पोलीस खाते हे बदनामीचे झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमनाथ प्रकरणी विधानसभेत खोटी माहिती दिली, पण विरोधकांनी त्यावर हक्कभंग आणला नाही. यावरून सत्ताधारी आणि विरोधक यांची मिलीभगत दिसून येते. ओबीसी आरक्षणासंदर्भात सरकारचे दुहेरी धोरण सुरू आहे. एकीकडे जनतेसमोर जीआर रद्द करण्याचे आश्वासन दिले जाते, तर न्यायालयात त्याच जीआरचा बचाव केला जातो, असेही त्यांनी सांगितले.
राहूल गांधींसह उध्दव ठाकरेंवर टीका
राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे हे फसवाफसवीचे राजकारण करत आहेत. निवडणूक आयोगाला वेळोवेळी कोंडीत पकडण्याचा प्रयत्न होतो, पण जेव्हा ठोस भूमिका घ्यायची वेळ येते, तेव्हा दोघेही मागे हटतात. पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सरकारने ३१ हजार कोटींची मदत जाहीर केली असली, तरी हा केवळ आकड्यांचा खेळ आहे. प्रत्यक्षात शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचत नाही, असे आंबेडकर म्हणाले.