अधिकच्या प्रवास भाड्यासह ४ हजार रुपये ग्राहकास द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:15 IST2021-02-08T04:15:27+5:302021-02-08T04:15:27+5:30

परभणी : त्रुटीची सेवा दिल्याप्रकरणी आकारण्यात आलेले अधिकचे प्रवास भाडे आणि मानसिक त्रासापोटी २ हजार व तक्रारीचा खर्च २ ...

Pay Rs 4,000 to the customer along with additional travel fare | अधिकच्या प्रवास भाड्यासह ४ हजार रुपये ग्राहकास द्या

अधिकच्या प्रवास भाड्यासह ४ हजार रुपये ग्राहकास द्या

परभणी : त्रुटीची सेवा दिल्याप्रकरणी आकारण्यात आलेले अधिकचे प्रवास भाडे आणि मानसिक त्रासापोटी २ हजार व तक्रारीचा खर्च २ हजार रुपये असे ४ हजार रुपये ४५ दिवसांच्या आत ग्राहकाला परत करण्याचा आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने दिला आहे.

येथील शांतीनिकेतन नगरातील पुंडलिक पांडुरंग सोनकांबळे यांनी ही तक्रार दाखल केली होती. ४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास पूर्णा तालुक्यातील देऊळगाव येथून परभणीकडे जाणाऱ्या बसने (क्र.एम.एच.२२/बीई १६३२) ते प्रवास करीत होते. पुंडलिक सोनकांबळे हे ज्येष्ठ नागरिक असल्याने त्यांनी पॅनकार्ड दाखवून सवलतीच्या अर्ध्या तिकिटाची मागणी केली. तेव्हा वाहक ए.डी. हरकळ यांनी ज्येष्ठ नागरिकाच्या सवलतीसाठी पॅनकार्ड चालत नाही, असे म्हणून सोनकांबळे यांच्याकडून पूर्ण तिकिटाचे ३५ रुपये घेऊन तिकीट दिले. या प्रकारानंतर सोनकांबळे यांनी विभागीय नियंत्रकांकडे लेखी तक्रार करुन जास्तीच्या घेतलेल्या १५ रुपयांची मागणी केली. मात्र त्यांना हे पैसे परत करण्यात आले नाहीत. त्यामुळे सोनकांबळे यांनी जिल्हा ग्राहक न्याय मंचाकडे तक्रार दाखल केली होती. मंचामध्ये या प्रकरणाची सुनावणी झाली. दोन्ही बाजूचे युक्तिवाद ऐकून ग्राहक मंचाच्या अध्यक्षा ए.जी. सातपुते, सदस्य किरण मंडोत, शेख इकबाल अहमद यांनी सोनकांबळे यांच्या बाजूने निकाल दिला आहे. त्यानुसार राज्य परिवहन महामंडळाचे विभागीय नियंत्रक आणि वाहक ए.डी. हारकळ यांनी संयुक्तरित्या तक्रारदारास मानसिक व शारीरिक त्रासापोटी २ हजार रुपये तसेच तक्रारीचा खर्च २ हजार रुपये आणि जास्तीचे आकारलेले प्रवास भाडे १५ रुपये ९ टक्के व्याजासह ४५ दिवसांत पुंडलिक सोनकांबळे यांना परत देण्याचे आदेश दिले. या प्रकरणात सोनकांबळे यांच्या वतीने ॲड.एन.व्ही. पिंपळगावकर यांनी काम पाहिले.

Web Title: Pay Rs 4,000 to the customer along with additional travel fare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.